दैनिक स्थैर्य | दि. १५ एप्रिल २०२४ | सातारा |
सातारा लोकसभेसाठी आम्ही उभे केलेले नाणे खणखणीत आहे, ते राजे आहेत आणि आम्ही प्रजा आहोत. राजांच्या अवस्थेबद्दल आम्ही काय बोलायचे?, असा तिरकस टोला लगावून सातारा पुरोगामी विचारांचा असून येथे परिवर्तन घडणारच, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांनी व्यक्त केला.
सातारा येथील प्रीती एक्झिक्युटीव्ह हॉटेलमध्ये खा. पवार यांना उदयनराजेंच्या उमेदवारीबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर पवारांनी वरील विधान केले. आमदार शशिकांत शिंदे यांचा लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरण्याकरता पवार जिल्हा दौर्यावर होते. अर्ज भरल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विविध प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी आमदार पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, शिवसेना उपनेते नितीन बानुगडे पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने उपस्थित होते.
पुढे बोलताना पवार म्हणाले की, देशात केंद्र सरकारचा ज्या पद्धतीने कारभार सुरू आहे, तो एककेंद्री प्रवृत्तीचा आहे. त्यामुळे परिवर्तन घडवण्याच्या दृष्टीने इंडिया आघाडी महाराष्ट्रातील ४८ जागा एकजूटपणाने लढवत आहे. त्यापैकी दोन तृतीयांश जागा इंडिया आघाडीला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको. सातार्यात सुद्धा आमचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर घोटाळ्यांचा आरोप करणार्यांना आम्ही चोख उत्तर देणार आहोत. आमचे नाणे खणखणीत आहे. सातारा पुरोगामी विचारांचा असून येथे परिवर्तन घडणारच, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांनी व्यक्त केला.
शरद पवार म्हणाले, इंडिया आघाडीचे एक सूत्र आहे. महाराष्ट्रातील ४८ जागा एकजूटपणाने लढून त्या मिळवण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी दहा वर्षात काय केले, असे सांगतात. मात्र, गेल्या दहा वर्षात त्यांचीच सत्ता होती. त्यामुळे त्यांनीच सांगावे, त्यांनी काय केले? २००४ ते २०१४ या काळात पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबरोबर मी महाराष्ट्रासाठी काय केले, हे मात्र निश्चित सांगू शकतो.
अजितदादा गटाच्या बारामतीचे उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासंदर्भात ‘घरातले’ आणि ‘बाहेरचे’ असे वक्तव्य शरद पवारांनी केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. यासंदर्भात नक्की काय विधान केले, असा प्रश्न पवारांना विचारला असता, ते म्हणाले की, माझ्या या विधानाचा गैरअर्थ लावला जात आहे. आधी बारामतीत मी लढलो, नंतर अजित पवार लढले, त्यानंतर सुप्रिया सुळे लढल्या, आता ते सुनेत्रा पवारांसाठी मत मागत आहेत, यासंदर्भाने मी बोललो होतो. त्यात कोणाचाही अवमान करण्याचा हेतू नाही. महिला सन्मान आणि महिला सक्षमीकरणाचे अनेक निर्णय मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना घेतले होते. त्यामुळे गैरअर्थ काढणार्यांविषयी मी बोलू शकत नाही.
महाराष्ट्रामध्ये ४८ पैकी महाविकास आघाडीच्या दोन तृतीयांश जागा निवडून येतील. महाराष्ट्रात परिवर्तनाची लाट आहे, आम्ही महाराष्ट्रात जिथे दौरा करतो तेथे मतदारराजा आम्हाला प्रतिसाद देत आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की, महाराष्ट्रात परिवर्तन घडणार! तसेच सातारा जिल्ह्यातही आम्ही आमदार शशिकांत शिंदे हा उमेदवार दिला आहे. आज उमेदवारी अर्ज भरताना झालेले शक्तिप्रदर्शन ही परिवर्तनाची सुरूवात आहे. पुरोगामी विचारांचा सातारा जिल्हा नेहमीच परिवर्तनाला बळ देतो, जे चांगलं आहे, त्यालाच प्राधान्य देतो. शशिकांत शिंदे हे आमचे नाणे खणखणीत आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संदर्भात दाखल आरोप करणारे नेमके आत्ताच आरोप का करतात, हे समजत नाही. मात्र, आमचे उमेदवार त्याला पत्रकार परिषद घेऊन स्वतंत्र उत्तर देतील, असे पवार म्हणाले.