राज्य सरकारकडून रेल्वे प्रवासासाठी अ‍ॅप मोबाइल, नेट नसलेल्या लोकल प्रवाशांचे काय?

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, मुंबई, दि.३१: कोरोना नियंत्रणात येत असून आता मुंबईतील सर्वसामान्यांसाठीही लोकल सेवा सुरू करावी, असा प्रस्ताव राज्य सरकारने रेल्वेला पाठवला आहे. दिवसभरात तीन टप्प्यांत सर्वांसाठी प्रवासाची मुभा देण्याची मागणी करण्यात आली आहे. तर रेल्वे प्रशासनाने लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी आधी उपाययोजना करा, अशी अट घातली. त्यानुसार, राज्य सरकारकडून सध्या प्रवाशांसाठी अ‍ॅपचे नियोजन सुरू असल्याचे सांगण्यात आले. पण अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइल तसेच इंटरनेट न वापरणा-या प्रवाशांचे काय, असा सवाल प्रवासी संघटनांनी केला आहे.

राज्य सरकारच्या एका अधिका-याने सांगितले की, आम्ही एक अ‍ॅप तयार करीत आहोत. प्रवासी संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी कलर कोडिंगवर काम सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांची गर्दी होणार नाही. प्रवाशांना कलर कोडिंग आणि ठराविक वेळेचे तिकीट देण्यात येईल.

कोरोना नियंत्रणात असला तरी त्याचा संसर्ग वाढू नये यासाठी सर्वसामान्यांकरिता लोकल प्रवास सुरू करतानाच अनेक गोष्टींचा विचार करण्यात येत आहे. गर्दी टाळण्यासाठी तसेच प्रवासी संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी कलर कोडिंगवर काम सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांची गर्दी होणार नाही. प्रवाशांना कलर कोडिंग आणि ठराविक वेळेचे तिकीट देण्यात येईल, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले. तर अद्याप अ‍ॅपचा प्रस्ताव आमच्यापर्यंत न आल्याने आताच याबाबत भाष्य करणे उचित ठरणार नाही, असे मत रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले.

मुंबई रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मधू कोटीयन म्हणाले, कामगार वर्गातील बहुतांश लोकांकडे अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइल नाही. घरकामगार, रोजंदारीवर काम करणा-या अनेकांकडे साधे मोबाइल आहेत. शिवाय अनेकांना अ‍ॅप डाऊनलोड करता येणार नाही.

दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. आदेश भगत म्हणाले, रेल्वे प्रवास करणारा केवळ अधिकारी वर्ग नाही. घरकामगार आहेत, माथाडी कामगार आहेत. कित्येक जणांकडे साधे मोबाइल नाहीत तर ते अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइल कोठून आणणार, हा प्रश्न आहे. हा निर्णय सर्वसामान्यांसाठी नाही.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!