स्थैर्य, फलटण, दि. ३० : सा. छत्रपतीचे संस्थापक संपादक, श्रीराम सहकारी साखर कारखान्यातील निवृत्त कर्मचारी, मुंबईतील कापड बाजार, लोखंडी जथ्यातील सर्वांशी घनिष्ठ मैत्री असलेले सुरेश कोंडीबा गायकवाड यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी वृद्धापकाळाने राहत्या घरी तरडगाव येथे आज सकाळी निधन झाले.
श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या अकौंट विभागात नोकरी लागण्यापूर्वी मुंबईत लोखंडी जथा, कापड बाजार, भायखळा वगैरे भागात कार्यरत असणाऱ्या फलटण तालुक्यातील लोकांशी घनिष्ठ मैत्री असलेल्या सुरेश गायकवाड यांनी काही काळ मुंबईत राहुन त्यांच्या प्रश्नांचा अभ्यास करुन तत्कालीन आमदार स्व. डॉ. कृष्णचंद्र भोईटे यांच्या माध्यमातून सदर प्रश्न शासनासमोर मांडण्याचा व त्याची सोडवणूक करण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता, श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या अकौंट विभागात नोकरी करताना अत्यंत हुशार व कर्तव्य दक्ष म्हणून सर्व अधिकारी त्यांचे कौतुक करीत असत.
कारखान्यातील निवृत्ती पूर्वी त्यांनी वृत्तपत्र क्षेत्रात प्रवेश केला आणि स्वतःचे साप्ताहिक छत्रपती हे वृत्तपत्र सुरु केले सेवा निवृत्तीनंतर त्यांनी या साप्ताहिकाच्या माध्यमातून तालुक्यातील विविध प्रश्नांची प्रभावी मांडणी करुन लोकांना साप्ताहिकाचा लळा लावला होता.
अलीकडे वृद्धापकालीन आजाराने ग्रासल्याने ते तरडगाव, ता. फलटण येथे वास्तव्यास होते, आज सकाळी राहत्या घरी त्यांचे निधन झाले, तरडगाव व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, आप्तेष्ट, मित्र मंडळींनी अंत्यदर्शन घेऊन गायकवाड कुटुंबियांचे सांत्वन केले. सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर तरडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, २ मुली, सून, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. तरडगाव ग्रामपंचायत सदस्य व सुर्यतेज उद्योग समुहाचे सर्वेसर्वा प्रशांत गायकवाड यांचे ते वडील होत.