स्थैर्य, कोल्हापूर, दि.१ : दिल्लीत शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या आणि शेतकरी मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र सरकार विरूध्द कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळताना पोलिस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. माजी खासदार राजू शेट्टी यांचीही कॉलर धरून त्यांना आंदोलनाबाहेर करण्याचा प्रयत्न केला. यामुळे कार्यकर्ते अधिक संतप्त होवून पोलिसांच्या अंगावर धावून गेले.
दरम्यान, पोलिसांनी शेट्टींची माफी मागावी, अशी मागणी करत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देणे सुरु केल्या. यावर श्री शेट्टी यांनी पोलिसांनी त्यांचे काम केले आता शेतकरी प्रश्नांसाठी आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची कॉलर धरू असे उत्तर दिले. त्यानंतर कार्यकर्ते शांत झाले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु असातानच पोलिसांनी कार्यकर्त्यांच्या वाहनातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी पोलिस हे मोदींचे हस्तक आहेत का? असा सवाल करत पोलिसांच्या हातातील पुतळा काढून घेण्यासाठी झटापट करु लागले. यातच एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांची कॉलर पकडून आंदोलनातून बाहेर घेण्याचा प्रयत्न केला. हे सर्व कायकर्त्यांच्या समोरच झाले. त्यामुळे संतप्त कार्यकर्ते पोलिसांच्या अंगावर धावून गेले.
परिस्थिती पोलिसांच्या हाताबाहेर जाण्याचा परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे राखीव पोलिस दलाची एक तुकडी मागवण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी श्री शेट्टी यांची माफी मागावी असा आग्रह धरत घोषणा दिल्या. पण शेट्टी यांनी समजूदारपणा दाखवत पोलिसांनी आपले काम केले. आता आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कॉलर पकडून त्यांनाच शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करायला लावू असे आवाहन केले. यावर कार्यकर्तेही शांत झाले.