स्थैर्य, नवी दिल्ली, दि. 17 : गलवान खोऱ्यात चीन आणि भारतीय सैन्यात झालेल्या चकमकीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैनिकांचं बलिदान व्यर्थ जाऊ दिलं जाणार नाही. आमच्यासाठी देशाची अखंडता आणि सार्वभौमत्व महत्त्वाचं आहे. आम्हाला शांती हवी आहे पण भारताकडे चोख प्रत्युत्तर देण्याची क्षमता आहे. असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर देशातील विविध राज्यांतील मुख्यमंत्र्यांसोबत आयोजित ऑनलाईन बैठकीच्या सुरुवातीला मोदी बोलत होते. यावेळी सर्वांनी भारत-चीन सीमेवर चकमकीत ठार झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली.
“भारताने नेहमीच शेजारी देशांसोबत सहकार्याची भावना ठेवली आहे. आपण कधीच कुणाला उचकवत नाही. पण वेळ आल्यानंतर त्यांना धडा शिकवतो.
वेळ आल्यानंतर आपण आपलं सामर्थ्य दाखवून दिलं आहे. त्याग आणि बलिदानासोबतच शौर्य आणि धाडसही दाखवता येतं. आम्हाला शांती हवी आहे. पण जशास तसे उत्तर देण्यासही भारत सक्षम आहे,” असं मोदी म्हणाले.