
स्थैर्य, फलटण, दि. २५ नोव्हेंबर : फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक १ मधील (१-ब) जागेसाठी शिवसेनेच्या वतीने म्हणजेच राजे गटाच्या अधिकृत उमेदवार सौ. सुमन रमेश पवार यांनी प्रभागाचा सर्वांगीण विकास करणे हेच आपले सर्वात महत्त्वाचे ध्येय असून, त्यासाठी आपण पूर्णपणे तयार आहोत, असे मत व्यक्त केले आहे.
मतदारांशी बोलताना सुमन पवार म्हणाल्या की, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या प्रभागात यापूर्वीही खूप विकासकामे झालेली आहेत. ही विकासाची घडी अशीच कायम ठेवण्यासाठी आणि ती परंपरा पुढे नेण्यासाठीच आपण ही निवडणूक लढवत आहोत.
त्यांनी मतदारांना आवाहन केले आहे की, येणाऱ्या काळात प्रभागातील रस्ते, पाणी, स्वच्छता आणि नागरिकांच्या मूलभूत सोयी-सुविधांसाठी आपण नेहमी तत्पर राहू. प्रभागाच्या या विकास प्रवाहात आपल्याला साथ देण्यासाठी मतदारांनी शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ या चिन्हावर मतदान करावे. तसेच, नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे यांनाही भरघोस मतांनी विजयी करावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.
प्रभाग क्रमांक १ मध्ये सौ. सुमन पवार यांच्या उमेदवारीमुळे राजे गटाची बाजू मजबूत झाली आहे, असे मानले जात आहे. त्यांनी आता मतदारांच्या भेटीगाठी घेऊन प्रचाराला सुरुवात केली आहे.

