दैनिक स्थैर्य । दि. १७ सप्टेंबर २०२२ । नांदेड । मराठवाड्याच्या विकासाच्यादृष्टिने गेल्या काही वर्षांपासून आपण प्रयत्न करत आहोत. अजून खूप काही काम करावे लागेल. येथील सिंचनाचे प्रश्न ऐरणीवर आहेत. याचा सखोल अभ्यास करून यावर काम करण्याचा निर्णय घेतला. एकाबाजुला पश्चिम वाहिनी नद्यातील मुबलक पाणी समुद्राला वाहून जाते. हे पाणी तुटीच्या गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मराठवाड्याला आता दुष्काळातून मुक्तीसाठी पुढे येण्याची गरज असून येथील शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करू, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मराठवाडा मुक्ती दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मुख्य शासकीय समारंभात ते बोलत होते.
येथील माता गुजरीजी विसावा उद्यान येथे आयोजित समारंभास माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, महापौर जयश्री पावडे, आमदार अमर राजुरकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार मोहनअण्णा हंबर्डे, आमदार भिमराव केराम, आमदार शामसुंदर शिंदे, आमदार राजेश पवार, माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांता पाटील, जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक निलेश मोरे, स्वातंत्र्य सैनिक विष्णुपंत पुराणिक, वारसा पत्नी गयाबाई करडीले, रुक्मीदेवी शर्मा, सुर्यकांताबाई गनमुखे, बालाजी जोशी, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करतांना मराठवाडा मुक्तीचा अमृत महोत्सव सुरू होत आहे. भारताला स्वातंत्र्य मिळूनही मराठवाड्याला आणखी 13 महिने स्वातंत्र्याची वाट पहावी लागली. निजामाशी संघर्ष करावा लागला. अनेकांना यात हौतात्म्य आले. निझामाने भारतात येण्यास नकार दिल्यामुळे स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली दिलेला मराठवाडा मुक्तीचा लढा हा सर्वार्थाने व्यापक लढा आहे. याचे वेगळे मूल्य आहे. मराठी, तेलगू, कन्नड असा मातृ भाषेतून शिक्षणाला विरोध करून ऊर्दूतून शिक्षणासाठी सक्ती केल्याने स्वामी रामानंद तीर्थ यांनी या लढ्याची बिजे पेरली. निझामाच्या अत्याचाराची परिसीमा वाढली होती. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन पोलो-पोलीस ॲक्शन करण्याची वेळ निझामाने आणली. पोलीस कारवाईमुळे हा प्रांत भारतात विलीन झाला, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मराठवाडा मुक्तीचे मोल अधिक आहे. याचबरोबर मराठवाड्याच्या स्वातंत्र्याचेही मोल अधिक आहे. हे स्वातंत्र्य स्वैराचारात रुपांतरीत होणार नाही याची काळजी घेऊन स्वातंत्र्यातील समता, बंधुता याचे जे मूल्य आहे ते आपण प्राणपणाने जपू असा संकल्प घेण्याचा आजचा दिवस असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठवाडा ग्रीड या महत्वाकांक्षी प्रकल्पावर आपण काम केले. यात जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून जलसंधारणाचे मोठे काम उभे झाले. यावर आयआयटीने शास्त्रीय बाजू तपासून पाहिल्या. त्यावर त्यांनी अहवाल तयार केला. हा अहवाल मा. उच्च न्यायालयाने स्वीकारला. या कामाचा अधिक सकारात्मक परिणाम मराठवाड्यात झाल्याचे नमूद केल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. याबाबत कोणाचे गैरसमज असतील ते दूर करून मोठे काम उभे करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मराठवाड्यातील विकासाचा अनुशेष हा महत्वाचा विषय आहे. यावर्षी काही मंडळात चार-चारवेळा अतिवृष्टी झाली. शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. यातून सावरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत आम्हा सर्वांशी तात्काळ विचारविनिमय करून सुमारे 750 कोटी रुपये अतिवृष्टीग्रस्तांसाठी देवू केले. याचबरोबर 65 एमएम पावसाची जी मर्यादा होती त्या मर्यादेबाबतही सकारात्मक विचार केला. ऐरवी दोन हेक्टर ऐवजी मदतीसाठी 3 हेक्टरची मर्यादा केली. या प्रश्नावर सरकार अतिशय प्रमाणिकपणे विचार करून निर्णय घेत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मराठवाड्यातून नागपूर-मुंबई एक्सप्रेसवेला जोडण्याच्यादृष्टिने नांदेड-जालना समृद्धी मार्गासाठी कटिबद्ध आहोत. यासाठी जे भूसंपादन झाले आहे त्याचा निधी उपलब्ध करून दिल्याचे ते म्हणाले.
यावेळी नांदेडचे भूमिपुत्र शहिद सहायक कमांडेट सुधाकर राजेंद्र शिंदे यांच्या अवलंबितास एक कोटी रूपयांचा धनादेशाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात देण्यात आले. याप्रसंगी नांदेड जिल्हा परिषद यांच्याकडून तयार करण्यात आलेल्या नांदेड जिल्हा पुस्तीकेचे विमोचन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आरोग्य विभाग, जिल्हा परिषद यांच्याकडून तयार करण्यात आलेल्या पोषण मार्गदर्शिचे विमोचन करण्यात आले. जिल्हा परिषद नांदेड कडून तयार करण्यात आलेल्या मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरव गाथा या घडीपुस्तीकेचे विमोचन याप्रसंगी करण्यात आले. तसेच कृषी विभागाच्या योजनांचे व रानभाजी पाककृती पुस्तीकेचे विमोचन करण्यात आले. परेड कमांडर विजयकुमार धोंगडे यांच्या पथकाने शहीद स्मारकाला जनरल सॅल्युट सलामी दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गटशिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी व नायब तहसीलदार स्नेहलता स्वामी यांनी केले.