दैनिक स्थैर्य | दि. 09 जानेवारी 2024 | फलटण | फलटण शहरामध्ये सुरू करण्यात आलेले मराठा क्रांती मोर्चाचे संपर्क कार्यालय तालुका, शहर तसेच राज्याला दिशादर्शक ठरेल. मराठा आरक्षण आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. आरक्षणासाठीची न्यायालयीन लढाई आपण शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहोत. येणाऱ्या 19 फेब्रुवारीच्या आत आपण निश्चितपणे आरक्षण घेऊ असा निर्धार मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केला आहे.
फलटण येथे मराठा क्रांती मोर्च्याच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. तत्कालीन सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षण कोर्टामध्ये टिकले नाही त्यामुळे आपण सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली व मुंबई उच्च न्यायालयाला केसाची सुरुवात करावयास सांगितले, परंतु याबाबत सरकारला गांभीर्य नसल्याने ते वेळ मागत होते असे सांगून पाटील म्हणाले तत्कालीन सरकारने जे आरक्षण दिले ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये टिकले परंतु सुप्रीम कोर्टामध्ये टिकले नाही आता संपूर्ण मराठा समाज आरक्षणासाठी पेटून उठला आहे 100 तरुणांनी आरक्षणासाठी दिलेले बलिदान वाया जाणार नाही.
दरम्यान उद्घाटन सोहळ्यापुर्वी भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. खेळाडू मुली व पाच सुवासिनी महिलांनी छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून शोभा यात्रेला सुरुवात झाली. शोभा यात्रेमध्ये पारंपारिक वाद्यासह ढोल, ताशा, हलगी वाद्ये, फटाक्याच्या आतिषबाजीचा समावेश होता. यावेळी हजारो मराठा समाज बांधवांची उपस्थिती होती. शहरातील प्रमुख मार्गावरून शोभा यात्रा मध्यवर्ती कार्यालयाच्या ठिकाणी पोहचल्यानंतर खेळाडु मुलींच्या हस्ते ध्वज पूजन करून कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. यानंतर लातूर येथील शिवशाहीर संतोष साळुंखे यांचा शाहिरी पोवाड्याचा कार्यक्रम झाला.