दैनिक स्थैर्य | दि. २३ जानेवारी २०२५ | फलटण |
विद्यार्थ्यांनी वाहतूक नियम पाळावेत व आपल्या जीवनात सतर्क राहून पोलीस मित्र म्हणून काम करावे. त्यामुळे गुन्हेगारी रोखण्यात मदत होईल. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करताना ध्येय ठेवून प्रयत्न करून यशस्वी व्हावे. अपघात कारणे व उपाय यावरही त्यांनी मार्गदर्शन केले. आम्ही सावध करत असतो. तुम्ही सावध व सुरक्षित राहावे, असे पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे यांनी प्रतिपादन केले.
मुधोजी महाविद्यालय फलटणच्या राष्ट्रीय सेवा योजना व एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे “रस्ता सुरक्षा सप्ताह”निमित्त प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. पी. एच. कदम यांनी मार्गदर्शन केले. आपण स्वतःसाठी व इतरांसाठीही जगावे व प्रत्येक क्षेत्रात धैर्याने काम करावे व महापुरुषांची प्रेरणा घेऊन जीवनात वाटचाल करावी, असे सांगितले.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. अॅड. ए. के. शिंदे यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाच्या आयोजनाचा उद्देश सांगितला. एन.सी.सी. विभागप्रमुख लेफ्टनंट संतोष धुमाळ, प्रा. रेश्मा निकम, प्रा. काळेल मॅडम, प्रा. अक्षय अहिवळे व एन.एस.एस. व एनसीसीचे विद्यार्थी उपस्थित होते.
सूत्रसंचालन डॉ. अभिजीत धुलगुडे यांनी केले व आभार प्रा. ललित वेळेकर यांनी मानले.