आम्ही म्हसवडकरच्या दणक्याने प्रशासनाने खाजगी रुग्णालय केले अधिग्रहण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, म्हसवड : म्हसवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असुन रोज वाढणार्या कोरोना रुग्णांना दाखल करण्यासाठी म्हसवडसह जिल्ह्यात कोठेही बेड उपलब्ध होत नसल्याने सर्वसामान्य रुग्णांचा होत असलेले हाल पाहुन शहरातील आम्ही म्हसवडकर ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी आज दि. २८ रोजी एकत्र येत म्हसवड आरोग्य केंद्रासमोर ठिय्या मांडत प्रशासनाच्या विरोधात जोरदार केलेल्या घोषणाबाजीची तात्काळ दखल घेत माण च्या प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी म्हसवड येथे येवुन शहरातील धन्वंतरी रुग्णालय हे ताब्यात घेत आजपासुन हे रुग्णालय कोव्हीड रुग्णालय म्हणुन ओळखले जाईल असे जाहीर केल्याने आम्ही म्हसवडकर च्या वतीने पुकारण्यात आलेल्या आलेल्या या आंदोलनाला अखेर यश मिळाले असल्याच्या भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.

म्हसवड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या ही १५० च्या घरात गेली असुन शहरात दररोज वाढत जाणार्या रुग्णांना अँडमीट करण्यासाठी येथील कोव्हीड सेंटर मध्ये बेड उपलब्ध नाहीत ही बाब गंभीर असल्याने म्हसवड सह परिसरातील बाधित रुग्णांना वेळेवर बेड उपलब्ध व्हावे याकरीता येथील म्हसवडकर ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करुन यामध्ये प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणी केली होती मात्र त्यांच्या या मागणीकडे प्रशासनाने साफ दुर्लक्ष केल्याने आज म्हसवड शहरात रुग्ण दाखल करण्यास खुप अडचणी येत आहेत. येथील परिस्थिती हाताबाहेर जावु नये याकरीता सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शहरातील ३ खाजगी रुग्णालये अधिग्रहण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले असताना देखील केवळ प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे व खाजगी रुग्णालयाशी असलेले आपले हित संबध जोपासण्यासाठी प्रशासनाकडुन ती ताब्यात घेण्यात आली नव्हती. मात्र दररोज म्हसवड शहरात रुग्ण झपाट्याने वाढु लागल्याने अखेर शहरातील आम्ही म्हसवडकर ग्रुप ने एकत्र येत येथील आरोग्य केंद्रातच ठिय्या मांडत जोवर म्हसवड शहरातील खाजगी रुग्णालयांचे अधिग्रहण प्रशासन करणार नाही तोवर जागेवरुन न उठण्याचा निर्धार करीत प्रशासनाच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली या नारेबाजीची दखल घेत सदर आंदोलनाला माणच्या तहसिलदार बाई माने, व प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी भेट देत आंदोलनकर्त्यांशी चर्चा करुन त्यांना सोबत घेत येथील धन्वंतरी रुग्णालय गाठत ते अधिग्रहण करुन ताब्यात घेतले. यावेळी तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ लक्ष्मण कोडलकर, डॉ. भारत काकडे, मुख्याधिकारी सचिन माने, स.पो.नि. गणेश वाघमोडे,  मंडलाधिकारी दळवी, तलाठी आखडमल आदीजण उपस्थित होते.

सुमारे ३ तास आम्ही म्हसवडकर चे कार्यकर्ते रस्त्यावर –

म्हसवड शहरातील वाढणार्या कोरोना रुग्णांना जिल्ह्यात कोठेच बेड उपलब्ध होत नसल्याने प्रशासनाने जिल्हाधिकार्यांचा आदेश पाळत शहरातील खाजगी रुग्णालयांचे त्वरीत अधिग्रहण करावे यासाठी शहरातील आम्ही म्हसवडकर ग्रुपचे सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी येथील आरोग्य केंद्रासमोर सुमारे ३ तास ठिय्या मांडत आंदोलन केले.

जय भगवान हॉस्पिटल अधिग्रहण करण्यास प्रशासनाची टाळाटाळ –

शहरात सध्या गत ६ महिन्यांपासुन बंद असलेले जय भगवान हॉस्पिटल हे कोव्हीड सेंटरसाठी उपलब्ध करुन देण्याची तयारी हॉस्पिटल चे मालक डॉ. राजेंद्र खाडे यांनी केली असताना केवळ किरकोळ तांत्रिक कारणाने सदरचे हॉस्पिटल अधिग्रहण करण्यास प्रशासनाकडुन टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप या आंदोलनकर्त्यांकडुन करण्यात आला.

प्रशासनाकडुन मेरी माता व दोलताडे रुग्णालयाची पाहणी –

म्हसवड शहरात अधिग्रहण केलेले धन्वंतरी रुग्णालय फुल्ल झाल्यावर त्यानंतर रुग्णांना दाखल करण्यास आरोग्य विभागाला कोणतीही अडचण येवु नये म्हणुन प्रातांधिकारी जिरंगे तहसिलदार बाई माने, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ लक्ष्मण कोडलकर, डॉ. कदम मुख्याधिकारी सचिन माने, स.पो.नि. गणेश वाघमोडे, मंडलाधिकारी दळवी, तलाठी आखडमल यांच्या पथकाने शहरातील मेरी माता हायस्कुल व दोलताडे हॉस्पिटल ला भेट देत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.

कोरोना संपेपर्यंत आम्ही म्हसवडकर चा लढा सुरुच राहणार –

कोरोनाचा संसर्ग जेव्हा पासुन सुरु झाला आहे तेव्हापासुन शहरातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी आपले राजकीय गट – तट बाजुला ठेवत शहरवासीयांची सेवा करण्यासाठी एकत्र येत शहरात आम्ही म्हसवडकर नावाचा एक ग्रुप तयार केला असुन या ग्रुप ने आजवर शहरात गस्त घालणे, प्रशासनाला सर्वोतोपरी मदत करणे, रुग्णांना रुग्णवाहिका उपलब्ध करुन देणे, त्यांना बेड उपलब्ध करुन देणे, खाजगी रुग्णालयातील रुग्णांना व शहरातील निराधार, वेडसरांना दोन वेळचे अन्न देणे, शहरात रक्तदान शिबीर घेणे, गरीब विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुनदेणे असे काही सामाजीक उपक्रम राबवत असुन शहरातील बाधित रुग्णांना बेड उपलब्ध करण्यासाठी त्यांनी सदरचे आंदोलन केले असले तरी कोरोना जोवर पुर्णपणे संपत नाही तोवर आम्ही म्हसवडकर चा लढा हा असाच कायम सुरु राहणार असल्याचे या ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!