
दैनिक स्थैर्य । दि. २६ फेब्रुवारी २०२२ । वडूज । स्वत: एकही संस्था न उभारता दुसर्याच्या संस्था गिळंकृत करत गेली 25 वर्षे सुरेंद्र गुदगे यांनी मोठ्या प्रमाणावर अनागोंदी कारभार केला आहे. आता त्यांचे शंभर अपराध भरत आले असून त्यांनाच आम्ही नजीकच्या काळात तुरुंगात पाठवणार आहे. असा पलटवार माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगांवकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
वडूज येथील शासकीय विश्रामधाममध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ माळी, मायणी बँकेचे निवृत्ती वसुली अधिकारी जनार्दन देशमुख, प्राचार्य दिलीपराव पुस्तके यांची उपस्थिती होती.
डॉ. येळगांवकर म्हणाले, मायणी येथील यशवंत विकास सेवा सोसायटी, मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळ, नेहरु वाचनालय या सर्व संस्थांची स्थापना कै. ज. गो. जाधव, पुस्तके, येळगांवकर यांनी केलेली आहे. सुरेंद्र गुदगे या ठिकाणी आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचे काम करत आहेत. यशवंत वि.का.स.सेवा सोसायटीचे 1810 पैकी 1000 सभासद मयत आहेत. त्यांची वारस नोंद केली नाही. अनेक सभासदांना राजकीय द्वेषापोटी शून्य टक्के व्याजदराने पिक कर्ज तसेच इतर व्यवसायिक योजना व कर्जमाफीपासून वंचित ठेवले. इकरार होवून बोजा चढविला तरी कर्ज दिले नाही. पालकमंत्री, सहकारमंत्र्यांनी आदेश देवूनसुध्दा त्या आदेशाला केराची टोपली दाखविली. गुदगे यांच्याकडे तीन चारचाकी गाड्या, मुलाला 30 ते 40 लाखाची दुचाकी, सातारा येथील बंगला, मॉल तसेच पुणे येथे मोठ्या प्रमाणावर स्थावर मालमत्ता अशी अंदाजे 30 ते 40 कोटीची माया त्यांनी जमविली आहे. त्यांनी केलेल्या रस्त्याच्या कामाबाबत त्यांच्या पक्षातील इतर जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य तक्रारी करत असतात. त्यांच्यावर दोन फौजदारी गुन्हेही दाखल आहेत. यापैकी एका आत्महत्येच्या प्रकरणासंदर्भात ते मध्यंतरी सहा महिने फरारही होते. या प्रकरणात त्यांना तात्पुरता जामीन मिळाला आहे. सोसायटीमार्फत चालविलेल्या छावणीतील गैरव्यवहाराचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मायणी बँकेने गंगाजळीत टाकलेल्या कर्ज प्रकरणाची सक्तीने वसुली सुरु आहे. बँकेच्या कर्ज प्रकरणातील घोटाळ्यामुळे अनेक कुटुंबे उद्वस्त झाली आहेत. थकीत कर्जदारांचे लिलाव काढून स्वत:च्या बगलबच्याच्या नावावर प्रॉपर्टी हडप करण्याचे अनेक उद्योग त्यांनी केले आहेत. बँकेतील अनियमित व्यवहाराबाबत त्यांच्यावर लेखापरिक्षकांनीही ताशेरे ओढले आहेत. या सर्व फाईली आमच्याकडे आहेत. आम्ही आत्तापर्यंत आई व भावाकडे पाहून त्यांच्या कारनाम्याकडे दुर्लक्ष करत होतो. मात्र यापुढच्या काळात त्यांना सुट्टी दिली जाणार नाही. यावेळी त्यांनी यशोदिप पतसंस्था थकीत कर्जामुळे तर यशोदीप दुध संघ, यशोदिप इथेनॉल प्रकल्प या संस्था शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे अडचणीत गेल्याचा निर्वाळाही त्यांनी दिला.
तर सोमनाथ माळी यांनी स्वत:चे कर्ज प्रकरण, जिल्हा बँकेच्या जागेचा खरेदी-विक्री व्यवहार, बाजार समितीच्या सचिव पदाची तत्कालीन नियुक्ती, विधानसभा, जिल्हा बँक निवडणूकीतील गुदगेंचा बाजार यासंदर्भात अनेक रंगतदार किस्से कथन केले. त्यांच्या कारनाम्यांचे एक पुस्तक होईल असे सांगितले. तर आम्ही त्यांच्याच तालमीत तयार झालो असल्यामुळे यापुढच्या काळात ‘ त्यांच्या ’ पोकळ धमक्यांना भिक घालणार नाही. असेही ठणकावून सांगितले. यावेळी त्यांनी गुदगे यांच्या विरोधात विभागीय सहकार आयुक्ताकडे दिलेल्या तक्रारीची प्रतही सादर केली.