स्थैर्य, फलटण, दि. ०४ : सध्या सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाने चांगलेच थैमान घातलेले आहे. रोज नव्याने रुग्ण सापडणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रणामावर आहे. हेच जाणून म्हसवड, ता. माण येथील आम्ही म्हसवडकर ग्रुपने सुरु केलेले कोव्हीड केअर सेंटरचे काम कौतुकास्पद असून आगामी काळामध्ये कोव्हीड केअर सेंटरसाठी सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या वेळी दिली. आम्ही म्हसवडकर ग्रुपच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या कोव्हीड केअर सेंटरला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रोख रुपये ५० हजार मदत केली.
यावेळी आमदार जयकुमार गोरे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, माण तालुका अध्यक्ष शिवाजीराव शिंदे, युवा नेते अभिजीत नाईक निंबाळकर, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर, प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ.भरत काकडे, आम्ही म्हसवडकर ग्रुपचे डॉ.राजेंद्र मोडासे, नगरसेवक अकिल काझी, माजी नगरसेवक युवराज सुर्यवंशी, कैलास भोरे, संजय टाकणे यांची उपस्थिती होती.