
थेट WhatsApp वर मिळवा
वाठार निंबाळकरजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील २७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. पतीसह दोन लहान मुली जखमी असून पसार चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.
स्थैर्य, फलटण, दि. १८ ऑक्टोबर : फलटण-पुसेगाव रस्त्यावरील वाठार निंबाळकर हद्दीत अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एका २७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. या अपघातात पतीसह दोन लहान मुली जखमी झाल्या असून, धडक दिल्यानंतर घटनास्थळावरून पसार झालेल्या अज्ञात वाहनचालकाविरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुचाकीला समोरून जोरदार धडक
अमर धोंडीराम चव्हाण हे पंधरा ऑक्टोबर रोजी रात्री त्यांच्या पत्नी सुचिता आणि दोन लहान मुलींसोबत दुचाकीवरून (क्र. एमएच ११ / सीव्ही ३२३५) जात होते. वाठार निंबाळकर हद्दीतील एका वीट भट्टीजवळ आले असता, पुसेगावकडून विरुद्ध दिशेने भरधाव वेगात आलेल्या एका अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली.
उपचारादरम्यान मृत्यू आणि चालकाचा शोध
या भीषण अपघातात अमर चव्हाण यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि दोन्ही मुली जखमी झाल्या. अपघातानंतर अज्ञात वाहनचालकाने जखमींना वैद्यकीय मदत न करता तेथून पलायन केले. उपचारादरम्यान सुचिता चव्हाण यांचा पुण्यातील रुग्णालयात मृत्यू झाला.
याप्रकरणी महेंद्र पुंडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, फलटण ग्रामीण पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.





