स्थैर्य, सातारा, दि. 12 : सातारा शहरालगत गोडोली या पंचायत समितीच्या गणात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणी पुरवठा केला जातो. या परिसरात असलेल्या सर्वच पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता पावसाळय़ापूर्वी केली गेली नाही. त्यामुळे मुबलक व स्वच्छ पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे पावसाळय़ापूर्वी तातडीने टाक्यांची स्वच्छता करुन घेण्यात यावी, अशी मागणी पंचायत समितीचे सदस्य आशुतोष चव्हाण यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे कली आहे. दरम्यान, हे काम तातडीने करण्यात यावे, अशीही आर्जव करण्यात आली.
शहरालगत गोडोली, विलासपूर, फॉरेस्ट कॉलनी या भागात अनेक अपार्टमेंट, बंगले, कॉलन्या आहेत.सुमारे 10 हजारहुन अधिक लोकसंख्या आहे. या भागाला पाणी पुरवठा हा आपल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून करण्यात येतो. दरवर्षी पावसाळयापूर्वी या परिसरातील पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता केली जाते. ठिकठिकाणी लागलेल्या गळत्यांची दुरुस्ती केली जाते. मात्र, यावर्षी पावसाळा काही दिवसांवर येवून ठेपला आहे. लॉकडाऊनमुळे या परिसरात टाक्यांच्या स्वच्छतेची कामे झाली नाहीत. आता मात्र हे काम करणे गरजेचे आहे. असलेल्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ केले नसल्याने काही ठिकाणी स्वच्छ निर्मळ पाणी पुरवठा होत नाही. पाण्याच्या टाक्यांची व किरकोळ दुरुस्ती करुन घेण्यात यावी. जेणेकरुन गोडोली गणातील नागरिकांना मुबलक, स्वच्छ पाणी पुरवठा होवू शकेल, अशी मागणी करण्यात आली आहे.