
स्थैर्य, 28 फेब्रुवारी, सातारा : साताऱ्यातील प्रभाग क्र. १६ मधील मुस्लिम लोकवस्ती असलेल्या भागात पवित्र रमजान महिन्यात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करून पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. ऐन उपवासाच्या काळात पाणी न सोडल्यामुळे मुस्लिम बांधवांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्राधिकरणाच्या कारभाराचे वाभाडे काढले.
या संदर्भात प्रभागातील नागरिकांनी शिवसेना युवासेना जिल्हा प्रमुख तथा समाजसेवक संभाजी पाटील यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. त्यानंतर नगरसेवक विनोद मोरे यांच्या समवेत त्यांनी बेट प्राधिकरण कार्यालय गाठून बरिष्ठ अधिकारी बाघमारे यांना जाब विचारला.
रमजान महिन्यात काही भागात ज्यात ठक्कर सिटी, यशवंत कॉलनी, देवी कॉलनी, कामाठीपुराचा समावेश आहे. इथे फक्त अर्धा तास पाणीपुरवठा होतो तर इतर ठिकाणी दोन तास पाणी सोडले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. विशिष्ट समाजाच्या घरांना जाणूनबुजून पाणी न देण्याचा संशय पाणी सोडण्याचे काम ठेकेदारामार्फत नियुक्त वॉलमॅनकडून होत आहे. प्राधिकरणाकडून वेगवेगळ्या ठिकाणी पाणी सोडण्यासाठी नेमलेल्या कामगाराकडून हा प्रकार होत असल्याचे नागरिकांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार व्यक्तीवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.शहरात सर्वांना समान पाणी पुरवठा करण्यात आला पाहिजे, कोणताही भाग असो ठरवून दिलेल्या वेळेत मुबलक पाणी मिळावे, असे सातारकरांचे म्हणणे आहे.
यावेळी संभाजी पाटील म्हणाले, “एखाद्या विशिष्ट समाजाच्या घरांना जाणूनबुजून पाणी न देणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. प्रभाग १६ मधील सर्व नागरिकांना मूलभूत सुविधा मिळणे हा त्यांचा संविधानिक अधिकार आहे. दोषी कामगाराला तात्काळ कामावरून काढले पाहिजे, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू. तसेच, प्रभागात पाण्याची कमतरता भासल्यास स्वखर्चातून पाण्याचे टैंकर उपलब्ध करून देण्याची तयारीही त्यांनी दर्शवली.
सातारा प्राधिकरण कार्यालयात भोगळ कारभार सुरू असल्याची टीका यावेळी करण्यात आली. पाईपलाईनचे काम ठेकेदारामार्फत केले जातेच; मात्र पाणी सोडण्याचे कामही ठेकेदाराकडून नेमलेल्या वॉलमनमार्फत होत असल्याने त्यांच्यावर प्राधिकरणाचे नियंत्रण नसल्याचा आरोप आहे. परिणामी, वॉलमन मनमानी करत असून नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सर्व भागात वेळेत व मुबलक पाणीपुरवठा करावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

