दैनिक स्थैर्य | दि. २३ मार्च २०२४ | फलटण |
फलटणच्या कोळकीमध्ये जलसंपदा विभागाची सर्व कार्यालये एका छताखाली घेवून सिंचन भवन उभारण्यात येणार आहे. यासोबत ‘व्हीव्हीआयपी’ व ‘व्हीआयपी’ असे मोठे जलसंपदा विभागाचे विश्रामगृहसुद्धा उभारण्यात येणार आहे. खासदार रणजितसिंह यांच्या विशेष प्रयत्नाने जलसंपदा विभागाची ही सर्व कार्यालये एकत्र येणार आहेत.
माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी २३ फेब्रुवारी २०२३ रोजी पत्र लिहून फलटण येथे नीरा देवघर प्रकल्प, धोम बलकवडी प्रकल्प, नीरा उजवा कालवा विभाग व कृष्णा भीमा स्थिरीकरण विभाग यांचे एकत्रित कार्यालय बांधण्यात यावे, अशी मागणी शासनाच्या जलसंपदा विभागाकडे केली होती. ही शासनस्तरावर मान्य केली आहे.
हे एकत्रित कार्यालये असलेले सिंचन भवन कोळकी (ता. फलटण) येथे होणार असून त्यामुळे या कार्यालयांचे शासकीय कामकाज सुलभ होणार आहे व स्थानिक शेतकरी व लाभधारक यांना सोईस्कर होणार असल्याचे जलसंपदा विभागाच्या परिपत्रकात म्हटले आहे.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची एकत्रित कार्यालयांची मागणी धोरणात्मक स्वरूपाची असल्याने शासनस्तरावरून त्याबाबत उचित निर्णय घेतल्याबद्दल जलसंपदा विभागाचे विशेष आभार यावेळी खासदार रणजितसिंह यांनी मानले आहेत.