दैनिक स्थैर्य | दि. 01 मे 2024 | फलटण | फलटण तालुक्यामध्ये जी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये फलटण तालुक्याला पाण्याची कमतरता भासू देणार नाही असे मत व्यक्त करीत धोम बलकवडी धरणा मधून फलटण तालुक्यासाठी पाणी सोडण्यात यावे; अशी मागणी जलसंपदा मंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केले होती. त्यानुसार त्यांनी तातडीने आदेश देत फलटण तालुक्यासाठी धोम बलकवडी धरणा मधून पाणी सोडण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. त्यांच्या सूचनेनुसार आज धोम बलकवडी धरणामधून फलटण तालुक्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे; अशी माहिती माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.
फलटण तालुक्यामध्ये पाण्याची कमतरता भासू नये; यासाठी शासनाच्या माध्यमातून पाण्याचे योग्य ते नियोजन करण्यात येत आहे. फलटण तालुक्याला पाणी सोडण्याची मागणी आपण जलसंपदा मंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली होती. यासोबतच वीर धरणामधून निरा उजव्या कॅनॉलच्या माध्यमातून सुद्धा पाणी सोडण्याबाबत आपण मागणी केलेली होती. त्यानुसार धोम बलकवडी धरणा मधून पाणी सोडले असून फलटण तालुक्यामध्ये 3 मे रोजी पाणी दाखल होणार आहे. 5 मे रोजी वीर धरणामधून फलटण तालुक्यासाठी नीरा उजव्या कॅनॉलच्या माध्यमातून पाणी सोडण्यात येणार आहे.