निरा देवघरचे पाणी फलटण तालुक्यात पाईप लाईनद्वारे वितरीत होणार : श्रीमंत रघुनाथराजेंची फेसबुक पोस्ट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २९ जून 2021 । फलटण । ‘‘निरा देवघरचे पाणी फलटण तालुक्यात पाईपलाईन द्वारे वितरीत होणार आहे. नामदार श्रीमंत रामराजे यांची फलटण व खंडाळा तालुक्याला ही पाणीदार भेट आहे. निरा देवघरचे पाणी आता लवकरच फलटणच्या शिवारात येणार आहे’’, अशी माहिती फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. या कामाबाबत संबंधित विभागाकडून अद्याप सविस्तर माहिती मिळाली नसली तरी श्रीमंत रघुनाथराजे यांच्या या पोस्टनंतर फलटणसह खंडाळा तालुक्यातील शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण पसले आहे.

सन 2019 सालच्या लोकसभा निवडणूकीत भाजपकडून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर विजयी झाल्यापासून निरा देवघरच्या पाण्यावरुन वारंवार राजकारण तापत आलेले आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगोला येथे दुष्काळी बैठकीत आवाज उठवत तत्कालीन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचेकडे नीरा देवघरच्या पाण्याबाबत मागणी केली होती. त्यानंतर फडणवीस सरकारने अध्यादेश काढत बारामतीकडे वळवलेले पाणी पुन्हा उजव्या कालव्यातील दुष्काळी सांगोला, माळशिरस, पंढरपूर फलटणला देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सन 2019 विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर राज्याच्या सत्तेतून भाजप पायउतार झाल्यानंतर विद्यमान महाविकास आघाडी सरकारने पुन्हा हा निर्णय बदलत निरा देवघर व गुंजवणी धरणाचे कालवे कार्यान्वित नसल्यामुळे विना वापर राहणारे पाणी समन्यायी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात निरा उजवा आणि डावा कालवा येथील लाभक्षेत्रास वाटप करण्याचा निर्णय घेतला.

निरा देवघर धरणाचे काम सन 2007 मध्ये पुर्ण असुन 11.73 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा निर्माण झालेला आहे. या प्रकल्पाच्या कालव्याची कामे अपूर्ण असल्याने नियोजित लाभक्षेत्रात पाणी वापर होऊ शकत नव्हते. त्यामुळे शिल्लक पाण्यावरुन पाणी वाटपाचे राजकारण होत होते. फलटण व खंडाळा तालुक्यातील नियोजित लाभ क्षेत्रात जाणून – बुजून कालव्याच्या प्रलंबित कामाकडे दुर्लक्ष करुन तालुक्याच्या हक्काचे पाणी बारामतीकडे वळवले जात असल्याचा आरोप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अनेकदा केला होता. मात्र; आता कालव्याच्या कामांना पर्याय म्हणून पाईप लाईन द्वारे पाण्याचे वितरण होणार असल्याचे संकेत श्रीमंत रघुनाथराजे यांच्या या पोस्टद्वारे मिळत असल्याने लवकरच फलटण व खंडाळा येथील शेतकर्‍यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


Back to top button
Don`t copy text!