
स्थैर्य, बारामती, दि. ०७ ऑगस्ट : केंद्र व राज्य शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत बारामती तालुक्यात ‘स्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण’ या विषयावर विशेष जलसाक्षरता प्रशिक्षण नुकतेच यशस्वीरित्या पार पडले. साईप्रेम ग्रामीण विकास संस्था, यवतमाळ यांनी जिल्हा परिषद पुणे आणि पंचायत समिती, बारामती यांच्या माध्यमातून या प्रशिक्षणाचे आयोजन केले होते.
हे प्रशिक्षण २२ जुलै ते २५ जुलै या कालावधीत शिर्सुफळ, उंडवडी सुपे, गुणवडी, कोऱ्हाळे बुद्रुक अशा विविध ठिकाणी एकूण ९ बॅचमध्ये देण्यात आले. यामध्ये तालुक्यातील ९८ ग्रामपंचायतींमधील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक, आशा आणि अंगणवाडी सेविका यांनी सहभाग घेतला.
जल व्यवस्थापन, जल जीवन मिशन योजना आणि भविष्यातील आव्हाने यावर मार्गदर्शन करून जलसाक्षरतेचे महत्त्व गावातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश होता. संस्थेचे अध्यक्ष रमेश भानवे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण पार पडले. प्रशिक्षणात सहभागींना माहिती पुस्तिका आणि प्रमाणपत्रही देण्यात आले.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन बारामती पंचायतीचे आरोग्य विभाग विस्तार अधिकारी सुनील जगताप, गुणवडी सरपंच सौ. प्राची घोडे यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते झाले. तालुका समन्वयक म्हणून राजेश गुंडाळे, सचिन कुचेकर आणि संग्राम नाळे यांनी काम पाहिले.