दैनिक स्थैर्य । दि. २९ जून २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यामध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आगमन व स्वागत कार्यक्रम पाडेगाव येथे संपन्न झाला पालखी सोहळ्यामध्ये सातारा जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन विभागामार्फत स्वच्छता दिंडी कलापथक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे पालखीतील सहभागी वारकऱ्यांचे स्वच्छता व प्लॅस्टिक बंदी बाबत प्रबोधन व जनजागृती कलापथक कार्यक्रमाच्या माध्यमातून करावे सातारा जिल्हा परिषदेचा हा जनजागृतीपर कलापथक कार्यक्रम कौतुकास्पद असून या माध्यमातून स्वच्छतेबाबत वारकऱ्यांचे प्रबोधन होईल असा विश्वास जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्या हस्ते स्वच्छता दिंडी उपक्रम शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, अर्चना वाघमळे, किरण सायमोते खंडाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण घोलप फलटण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ अमिता गावडे, जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षातील व खंडाळा पंचायत समितीमधील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सातारा जिल्हा हा स्वच्छता विषयामध्ये देशात कायम अग्रेसर राहिलेला आहे स्वच्छता ही मानवी जीवनाची सवय व्हावी तसेच लोकसहभागातून कुटुंब व गाव स्तरावर घन कचरा व सांडपाणी व्यवस्थापन व प्लास्टिक निर्मूलन यासारखे उपक्रम राबवून गावे स्वच्छ व सुंदर करावीत तसेच गावामध्ये पर्यावरण समृद्धी गाव सारखे उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात यावेत, असे आवाहनही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.
सातारा जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन कक्षामार्फत यावर्षी वारकऱ्यांमध्ये पाणी व स्वच्छता प्लास्टिक बंदी याबाबत जनजागृती व्हावी यासाठी स्वच्छता दिंडी कलापथक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सातारा जिल्ह्यातील मुक्काम विसाव्याच्या ठिकाणी पालखीतील सहभागी वारकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात वैयक्तिक स्वच्छतेसाठी फिरती शौचालय उभारली आहेत शुद्ध पिण्याचे पाणी टँकरद्वारे पुरवले जात आहे. प्लास्टिक संकलन केंद्र उभारली आहेत महिलांच्या स्वच्छता व आरोग्यसाठी पालखी मार्गावरील सर्व गावांमध्ये सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल मशीन बसवण्यात आलेल्या आहेत तसेच पालखी मार्गावरील मुक्काम विसाव्याच्या गावांमध्ये पाणी व स्वच्छता या विषयांचे जनजागृतीपर संदेश रंगवण्यात आलेले आहेत पालखी पश्चात मुक्कामाच्या विसाव्याच्या गावामध्ये दुर्गंधी व स्वच्छता होऊ नये यासाठी औषध फवारणी व मोठ्या प्रमाणामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी सांगितले.