स्थैर्य, मुंबई, दि.९: रेमडेसिविर हे कोरोना उपचारांसाठीचे आैषध सरकारीसह खासगी रुग्णालयांतील महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील लाभार्थींना मोफत देण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.
पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी विविध विभागांच्या २९ हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या सादर करण्यात आल्या. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुरवणी मागण्यांसंदर्भात उत्तर देताना टोपे बोलत होते. या वेळी त्यांनी विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या आरोपांनाही उत्तर दिले.
मृत्यू लपवले नाहीत
कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. मृत्युदरामध्ये होणारी वाढ ही आपल्या सर्वांसाठी चिंतेचा विषय आहे. आज महाराष्ट्रातील रुग्णसंख्या वाढत असली तरी कोविड-१९ मुळे झालेले मृत्यू कधीच लपवण्यात आले नाहीत, असा दावा टोपे यांनी केला.
४०४ प्रयोगशाळा
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत राज्यातील ४५० रुग्णालये येत होती. आता या योजनेखाली १००० रुग्णालये आली आहेत. शासकीय ३११ व खासगी ९३ मिळून एकूण ४०४ प्रयोगशाळा आहेत.