देशाला आत्मनिर्भर बनविण्यात वालचंद हिराचंद यांचे योगदान मोठे – राज्यपाल रमेश बैस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १७ जून २०२३ । मुंबई । स्वयंचलित वाहन निर्मिती, विमान निर्मिती, जहाज निर्मिती यांसह अनेक पायाभूत क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे उद्योगपती वालचंद हिराचंद यांनी पृथ्वी, जल, आकाश अशा तिन्ही लोकात भारताचा झेंडा रोवला. देश पारतंत्र्यात असताना प्रतिकूल परिस्थितीत उद्योगविश्व निर्माण करणाऱ्या हिराचंद यांचे योगदान सुवर्णाक्षरांनी लिहावे इतके मोठे असल्याचे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

वालचंद हिराचंद यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चरच्या वतीने राजभवन येथे ५० व्या  वालचंद स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला प्रामुख्याने उपस्थित होते.

आपण शाळेत असताना ‘मेड इन जर्मनी’च्या वस्तूंचा बोलबाला होता; पेनाची निब सुद्धा जर्मनीची असायची. कालांतराने ‘मेड इन जपान’चा काळ आला व अलीकडे ‘मेड इन चायना’चे दिवस आले. परंतु एकविसावे शतक ‘मेड इन इंडिया’चे असेल असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.  आज भारत आत्म-निर्भर देश होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे, त्याचे मोठे श्रेय वालचंद हिराचंद यांचेकडे जाते, असे राज्यपालांनी सांगितले.

वालचंद हिराचंद यांनी जहाज वाहतूक क्षेत्राला संजीवनी दिली. त्यांनी सुरु केलेल्या  महाराष्ट्र चेंबरने उद्योग व वाणिज्य या शिवाय कृषिक्षेत्राला महत्व दिले असे सांगून चेंबरने फलोत्पादन, फुलशेती, भरडधान्य शेती यांसह सेंद्रिय शेतीला चालना द्यावी असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

वालचंद हिराचंद यांचे जीवन प्रेरणादायी : ओम बिरला 

भारत ही संत, शूरवीर योद्धे आणि समाज सुधारकांची जशी भूमी आहे, तशीच ती महान उद्योजकांची देखील भूमी आहे. वालचंद हिराचंद यांनी बिकट परिस्थितीत उद्योग उभारणीसह नवीनता व संशोधनाचे काम केले. उद्योग विकासाची दूरदृष्टी असलेल्या वालचंद हिराचंद यांचे जीवन प्रेरणादायी असल्याचे उद्गार ओम बिरला यांनी याप्रसंगी काढले.

आज देश स्वातंत्र्याच्या अमृतकाळातून प्रवास करीत असताना भारत प्रत्येक क्षेत्रात नवीनता व संशोधन करीत आहे. कोविड लसीकरण मात्रा जगाला उपलब्ध करुन भारताने जगाला वाचवण्याचे काम केले आहे. तंत्रज्ञान व जागतिक हवामान बदल आदी क्षेत्रांमध्ये देखील भारत जगाला दिशा देण्याचे काम करीत असल्याचे सांगून सामूहिक प्रयत्न केल्यास विकसित भारताचे स्वप्न साकार होईल, असे ओम बिरला यांनी यावेळी सांगितले.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते वालचंद हिराचंद यांच्या कुटुंबातील ज्येष्ठ उद्योगपती अजित गुलाबचंद, अरविंद दोशी, वालचंदनगर वसाहतीचे प्रमुख चिराग दोशी, पद्मश्री  शरयू दोशी व पल्लवी झा यांचा सत्कार करण्यात आला.

चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी प्रास्ताविक केले तर माजी अध्यक्ष अरविंद दोशी यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमाला चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनिल कुमार लोढा, विविध देशांचे वाणिज्यदूत तसेच निमंत्रित सदस्य उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!