दैनिक स्थैर्य | दि. ११ नोव्हेंबर २०२४ | फलटण |
राखीव असलेला फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा नावालाच अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. इथे मात्र अनुसूचित जातीच्या उमेदवाराच्या पाठीमागून प्रस्थापितांचेच राजकारण आजपर्यंत फळत-फुलत आले आहे. त्यामुळे आंबेडकरी स्वायत्त राजकारणासाठी वंचित बहुजन आघाडीला मतदान करा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सचिन भिसे यांनी केले आहे.
सचिन भिसे म्हणाले की, ही लढाई पक्षीय पातळीवर किंवा पक्षाच्या किंवा कोणत्याही विचारधारेवर नसून ही लढाई दोन्ही निंबाळकरांच्या प्रतिष्ठेची बनली आहे. माझा समाज हा अनुसूचित जातीतील ५९ जातींपैकी दुसर्या क्रमांकावर महाराष्ट्रात असणारा मातंग समाज आहे. अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली, हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आमचे मोठे भाऊ असणार्या समाजातील प्रा. रमेश आढाव हे स्वाभिमानी शेतकरी पक्षातर्फे उभे आहेत. ‘एक निर्धार बौद्ध आमदार’ या संकल्पच्या अनुषंगाने त्यांना संविधान समर्थन समितीने पाठिंबा दिला आहे. आमच्याच अनुसूचित जाती प्रवर्गातून राष्ट्रीय समाज पक्षातर्फे दिगंबर आगवणे उभे आहेत. इतरही काही अपक्ष उमेदवार भारतीय संविधानाने त्यांना उभे राहण्याचा दिलेला अधिकार म्हणून ते आपले नशीब या मतदारसंघात आजमावत आहेत. महाविकास आघाडी व महायुती या दोन पक्षांतर्फे जोरदार प्रयत्न चालू आहेत. साम, दाम व दंड नीती वापरून प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. दीपक चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे महाविकास आघाडीचे प्रतिनिधित्व करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे सचिन कांबळे पाटील हे महायुतीचे प्रतिनिधित्व करत आहेत. दोघांकडेही तालुक्याच्या विधायक विकासाचे कोणतेही आदर्श रोल मॉडेल नाही. यांना एकदा फक्त निवडून यायचं आहे. कारण यांच्यामागून त्यांचे प्रस्थापित नेतेच राजकारण करणार आहेत.
सचिन भिसे पुढे म्हणाले की, महायुती व महाविकास आघाडी यांच्यासमोर इतर उमेदवारांचा टिकाव किती लागेल, हे चित्र आपल्या समोर आहेच. अनुसूचित जातीमधील इतर आमच्या उमेदवारांना मतदान कितीही पडले तरी त्याचा वैयक्तिक त्यांना व त्यांच्या पक्षाला किती फायदा होईल हे आपणा सर्वांना ज्ञात आहे. पण, वंचित बहुजन आघाडीला आपण दिलेलं एक मत किती महत्त्वाचे आहे हे आपण नीट समजून घ्यावे. वंचित बहुजन आघाडी या पक्षाला व पक्षाच्या राजकीय ताकदीला तुमचं एक मत राज्यात मजबूत करणार आहे. याच प्रस्थापित पक्षांनी स्वायत्त आंबेडकरी राजकारण संपवले आहे. ते पुन्हा उभे करायचे असेल तर अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट केल्याशिवाय ते होणार नाही, असे भिसे यांनी म्हटले आहे.
अनुसूचित जाती जमातीचे, ओबीसीचे आरक्षण धोक्यात आले आहे. ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणास व क्रीमिलिअर लावण्यास राज्यांना परवानगी दिल्याने हे आरक्षण संपणार आहे. हा निर्णय येताच काँग्रेसप्रणित दोन राज्यांमध्ये तातडीने सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय लागू करण्यात आला. महायुतीने राज्यात निवडणूक लागण्याच्या अगोदर तातडीने एक शासन निर्णय पारित करून त्यामध्ये क्रिमिलिअर लावल्यासंदर्भात अभ्यास समिती गठीत करून हा आरक्षण संपवण्याचा घाट घातला आहे. त्या शासन निर्णय आला महाविकास आघाडी व महायुती यांचा संयुक्त पाठिंबा असल्याचे दिसून येत आहे. कारण या निर्णयाविरुद्ध महाविकास आघाडीच्या कोणत्याही नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. याचा अर्थ स्पष्ट होतो की, अनुसूचित जाती जमातीच्या या आरक्षणाच्या वर्गीकरणास व क्रिमीलिअर लावल्यास याचा पाठिंबा आहे. अनुसूचित जाती जमाती व ओबीसींसाठी देण्यात आलेली घटनेमधील आरक्षण हे आज संपवण्यासाठीच प्रस्थापित पक्ष सरसावले आहेत. अशावेळी राज्यात किमान ओबीसीचे १०० आमदार सभागृहामध्ये असण्याची गरज आहे, असे भिसे म्हणाले.
पुढे बोलताना भिसे म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीने नेहमी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज आरक्षण मागत असताना तो ओबीसीच्या आरक्षणातून मागत आहे; परंतु वंचित बहुजन आघाडीने मराठा समाजाच्या आरक्षणाचे ताट वेगळे व ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या ताट वेगळे असावे ही भूमिका पहिल्यापासून घेतली आहे. प्रस्थापित पक्षाने मात्र यासंबंधीत विषयाच्या अनुषंगाने आपली स्पष्ट भूमिका आजही जाहीर केलेली नाही. त्यामुळे ही निवडणूक झाल्यानंतर अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणास व क्रिमीलिअर लावण्यात येईल. ज्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसीचे आरक्षण राज्यकर्त्यांच्या नाकतपणामुळे सुप्रीम कोर्टाने स्थगित केले आहे. त्यासाठी ओबीसी वर्गाचा इम्पीरिकल डेटा सुप्रीम कोर्टाने मागितला आहे; परंतु केंद्र सरकारकडे तो डेटा असताना त्यांनी तो दिला नाही. राज्य सरकारनेही तो डेटा कोर्टामध्ये न दिल्याने हे आरक्षण रद्द झाले आहे. तेव्हा येत्या काळामध्ये हे आरक्षण रद्द केले जाईल अशी परिस्थिती आहे. हे वाचवायचे असेल तर फक्त वंचित बहुजन आघाडीलाच सत्तेमध्ये यावे लागेल. राज्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकत वाढवण्यासाठी तुमचं एक मत अतिशय मोलाचं आहे. राज्यात आंबेडकरी स्वायत्त राजकारण बळकट करायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीलाच मतदान करण्याची गरज आहे. आमचे जे बांधव उभे आहेत, त्यांना मतदान करून ते निवडून येणार आहेत का? तुम्ही दिलेल्या मताचा त्यांना व त्यांच्या पक्षाला किती फायदा होईल? पण तुम्ही दिलेलं वंचित बहुजन आघाडीचे एक मतदान हे अॅड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांचे हात मजबूत करणार आहेत. तेव्हा स्वायत्त आंबेडकरी राजकारणासाठी वंचित बहुजन आघाडीला मतदान करा, असे आवाहनही सचिन भिसे यांनी मतदारांना केले आहे.