दैनिक स्थैर्य | दि. 25 जानेवारी 2023 | फलटण |अनेक वेळा विविध वादग्रस्त वागण्याने आणि बोलण्याने प्रसिद्ध असलेल्या फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील एका वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याने दारूच्या नशेत उपजिल्हा रुग्णालयातील कार्यालयाची दारे खिडक्यांची तोडफोड केली असून याबाबत अद्याप पोलिसात कसलाच गुन्हा दाखल झालेला नाही तोडफोडीच्या घटनेमुळे उपजिल्हा रुग्णालय भीतीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या चार वर्षापासून फलटण उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार रामभरोसे चालला असून अनेक वेळा रुग्णालयाच्या कारभाराबाबत तक्रार करून सुद्धा कोणीच दखल घेईनासे झाले आहे. चार वर्षांपूर्वी या रुग्णालयात बदलून आलेल्या एका अधिकाऱ्याने विक्षिप्त वागून अक्षरशः सर्व कर्मचारी आणि रुग्णांना सळो की पळो करून सोडलेले आहे. अनेक वेळा वादग्रस्त वक्तव्य करणे, कामावर कधीतरी येणे, दारू पिऊन येणे, गोंधळ घालणे यामुळे हा अधिकारी तालुक्यात कू प्रसिद्ध झालेला आहे. काल रात्री चक्क दारूच्या नशेतच वरिष्ठ व कनिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नावाने शिमगा करीत उपजिल्हा रुग्णालयातील कार्यालयाची त्याने तोडफोड केली आहे. कार्यालयाच्या काचा तसेच दारेपन फोडले आहे. काचांचा खच पडला आहे. विक्षिप्त स्वभावाच्या या अधिकाऱ्याला सर्वजण वैतागले असून रुग्णालयातील महिला कर्मचारी व रुग्ण भीतीने ग्रासले गेले आहेत. शासकीय मालमतेची तोडफोड करून सुद्धा अद्याप त्याच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही. यापूर्वी पण त्याने तोडफोड केल्याचे समजते मात्र वरिष्ठ अधिकारी त्याला पाठीशी घालत असल्याने त्याच्यावर कोणतीच कारवाई होताना दिसत नाही.
फलटण उपजिल्हा रुग्णालयात तोडफोड झाल्याच्या घटनेची अद्याप माझ्याकडे कोणतीही माहिती आलेली नाही माहिती घेऊन चौकशी करतो, असे मत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी व्यक्त केले.