व्होडाफोन-आयडियाच्या नेटवर्कची फलटण शहरासह तालुक्यात बोंबाबोंब; कॉलिंग आणि इंटरनेट वारंवार होतेय खंडित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २६ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
गेल्या काही दिवसांपासून देशभरात VI चं नेटवर्क स्लो झालं आहे. फलटण तालुक्यासह शहरातही व्होडाफोन-आयडिया या भारतीय मोबाईल सेवा पुरवठादार कंपन्यांचे VI नेटवर्कचे इंटरनेट आणि कॉलिंग सेवा बाधित होऊन वारंवार व्यत्यय आहे. त्यामुळे फलटण शहरासह तालुक्यात या मोबाईल कंपन्यांच्या सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. मोबाईल सेवेत व्यत्यय येत असल्यामुळे दहावी-बारावीचे परीक्षाधीन विद्यार्थी व सामान्य ग्राहकांना याचा प्रचंड त्रास होत आहे.

गेली १५ दिवसांपासून फलटण तालुक्यातील शहरासह अनेक गावात वोडाफोन-आयडिया चे तख नेटवर्क ये-जा करत असल्यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. ग्राहकांचे कॉलिंग होत नाही तसेच इंटरनेट डेटा चालत नसल्यामुळे त्यांची महत्त्वाची कामे खोळंबत आहेत. त्यामुळे या कंपन्यांचे ग्राहक त्रस्त झाले आहेत. वारंवार खंडित होत असलेल्या या VI नेटवर्कमुळे ग्राहक आता व्होडाफोन-आयडियाची मोबाईल सेवा बंद करून अन्य कंपन्यांच्या मोबाईल सेवेकडे वळत आहेत.

फलटण शहर, कोळकी, निरगुडी, गिरवी, दुधेबावी, खुंटे, सुरवडी , आंदरूड, गुणवरे, धुळदेव, अलगुडेवाडी या भागातले लोक गेले काही दिवसांच्या सततच्या नेटवर्क प्रॉब्लेममुळे त्रस्त झालेले आहेत. तसेच केलेल्या रिचार्जचा उपभोग घेता येत नसल्यामुळे लोकांना आर्थिक नुकसानही सहन करावे लागत आहे.

सध्या बारावी, दहावीच्या परीक्षा जवळ असल्याने विद्यार्थ्यांनादेखील याचा फटका सहन करावा लागत आहे. त्यांना मोबाईलवरील ऑनलाईन क्लासेसचा फायदा घेता येत नसल्यामुळे विद्यार्थी वैतागत आहेत. मोबाईलचा वापर करता येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

दरम्यान, फलटण शहर व तालुक्यातील ग्राहकांच्या अनेक तक्रारी या कंपन्यांच्या कस्टमर केअर सुविधेकडे नोंदविल्या जात आहेत. या कंपन्यांनी तात्काळ आपल्या मोबाईल सेवेत सुधारणा करून होणारा त्रास दूर करावा, अशी मागणी त्रस्त ग्राहक कंपन्यांकडे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!