दैनिक स्थैर्य | दि. ११ नोव्हेंबर २०२४ | फलटण | फलटण पंचायत समितीचे माजी सभापती तथा युवा नेते श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार दिपकराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ संपूर्ण फलटण तालुका पिंजून काढला असून जे तरुण व युवक राजे गटाच्या माध्यमातून कार्यरत आहेत त्यांना सोबत घेत नवीन तरुणांना व युवकांना सोबत घेण्याचे काम श्रीमंत विश्वजीतराजे करीत आहेत.
फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये कार्यरत असताना श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी युवकांना सोबत घेत पुढे जाण्याचे काम सुरू केले आहे. त्यांच्या सुरू असणाऱ्या दौऱ्यांना सुद्धा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असून तालुक्यातील युवा वर्ग विश्वजीतराजेंच्या माध्यमातून राजे गटाशी कनेक्ट झाला असल्याचे सुद्धा बोलले जात आहे.
श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात ही पंचायत समितीच्या माध्यमातून केली होती. पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये पंचायत समिती सदस्यांच्या माध्यमातून त्यांनी फलटण तालुक्यातील विविध प्रश्नांची जाण करून घेतली व ते प्रश्न सोडवण्यासाठी विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी विविध प्रयत्न केले व तालुक्यातील तरुणांचे प्रश्न सोडवण्यामध्ये ते यशस्वी सुद्धा झाले आहेत.
आता सुरू असलेल्या निवडणुकीमध्ये श्रीमंत रामराजे, श्रीमंत रघुनाथराजे व श्रीमंत संजीवराजे यांनी गत ३० वर्षांमध्ये केलेल्या कामांची मांडणी ते युवकांपुढे करत असून सर्व युवकांनी श्रीमंत रामराजे यांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार दिपक चव्हाण यांना तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा पुढे मतदान करण्याचे आवाहन सुद्धा ते करीत आहेत.