स्थैर्य, सातारा, दि. 25 : आरोग्य विभागात सगळा खराटाच लावला जात आहे. 20 प्रभागातून कचरा गोळा करण्यासाठी पालिकेच्या घंटागाडय़ा चालवण्याचे ठेके दोन ठेकेदारांनी घेतले गेले आहेत. या ठेकेदारांकडून असे तसेच काम होत असून प्रति महिना पाच प्रभागातील बील 4 लाख 65 हजाराच्या बिला ऐवजी 4 लाख 60 हजाराच्या दरम्यान बिल काढले जात आहे. वास्तविक कचरा गोळा करताना नियमांना तिलांजली दिली जात असून केवळ दंड मात्र प्रत्येक पाच प्रभागामध्ये 16 रुपये असा केला गेला असून सुमारे1288 रुपये दंड केला आहे. करारनाम्यातील तरतूदीही 40 नगरसेवकांना माहितीच नसल्याने हा सगळा कारभार सध्या पालिकेत सुरु आहे. दरम्यान, शहरात जे कंटेटमेंट झोन आहेत. तेथील कचरा गोळा करुन थेट घंटागाडीद्वारे सोनगाव कचरा डेपोत पडत असल्याच्या तक्रारी होत आहेत.
सातारा पालिकेत आरोग्य विभागात कचऱ्यातूनही पैसा मिळवणारे अनेक मासे आहेत. त्यामुळे शहराच्या स्वच्छतेशी त्यांना काही घेणेदेणे नाही. आपला खिसा गरम झाला म्हणजे झालं, अशी पद्धत त्यांच्याकडून सुरु असून खोऱयाने उपसाच लावला आहे. शहरातील 20 प्रभागातील कचरा गोळा करण्यासाठी दोन ठेकेदारांना ठेके दिले गेले आहेत. पालिकेच्या घंटागाडय़ा फक्त शहरातून कचरा गोळा करुन तो सोनगाव कचरा डेपोत टाकायचा आहे. त्यामध्ये कचरा विलिनीकरण करणे, डेपोपर्यंत पोहचवणे, घंटागाडीसाठी चालक, कामगार पुरवणे, इंधन पुरवणे, गाडय़ांची वार्षिक देखभाल करणे असे करारात आहे. त्याकरता महिन्याकाठी पाच प्रभागासाठी 4 लाख 65 हजार 581 रुपयांचे बील देण्यात येणार आहे. त्या करारपत्रकावर 47 अटी आहेत. मात्र, शहरात गोळा करणाऱ्या घंटागाडय़ांकडून नियमांना तिलांजली दिली जात आहे. ओला व सुका वेगवेगळा केला जात नाही. घंटागाडय़ा आलेल्याच काही ठिकाणी समजत नाहीत. गणवेश नाही. तरीही नियम मोडणाऱ्या या घंटागाडी ठेकेदारांचे बील तसेच निघत असून दंड केवळ 16 रुपये ते 200 रुपये होत आहे. असा एकुण 1288 रुपये करण्यात आला आहे.
भाग्यदीप्स वेस्ट मॅनेजमेंटला प्रभाग 1 ते 5 पर्यंत घंटागाडय़ांना दंड 432 रुपये, आयकर 10 हजार 115 रुपये, जीएसटी, 10 हजार 10 हजार 115 रुपये, सुरक्षा अनामत 15 हजार 172 रुपये, अशी एकूण 35 हजार 834 रुपये कट करुन 4 लाख 69 हजार 911 रुपयांचे बिल काढण्यात आले आहे. प्रभाग 6 ते 10 पर्यंतचा घंटागाडयांना दंड 316 रुपये, आयकर 10 हजार 131 रुपये, जीएसटी 10हजार 131 रुपये, सुरक्षा अनामत 15 हजार196 रुपये अशी 35 हजार 774 रुपये कट करुन 4 लाख 70 हजार 759 रुपयांचे बिल काढण्यात आले आहे. प्रभाग 10 ते 15 पर्यंत दंड 324 रुपये, आयकर 10 हजार 130 रुपये, जीएसटी 10 हजार 130 रुपये, सुरक्षा अनामत रुपये 15 हजार 194 रुपये असे 35 हजार 778 रुपये वजा करुन 4 लाख 70 हजार 719 रुपये बील काढण्यात आले आहे. स्वा. वि. दा. सावरकर या संस्थेने प्रभाग 16 ते 20 साठी दंड 216 रुपये, आयकर 9 हजार 897 रुपये, जीएसटी 9 हजार 897 रुपये सुरक्षा अनामत 14 हजार 846 रुपये असे 34 हजार 856 रुपये वजा करुन 4 लाख 60 हजार 017 रुपये एवढे एका महिन्याचे बील काढण्यात आले आहे.
घंटागाडीचा दि.20 मार्च 2020 ला झालेल्या करारात दिलेल्या 47 अटीनुसार अनेक नियमांची पायमल्ली ठेकेदारांकडून होत आहे. त्यात दंडाचा रकाना 46 वा आहे. त्यानुसार घंटागाडीवर बिगारी नसला तर प्रतिदिन 200 रुपये, घंटा नसली तरी प्रतिदिन 100 रुपये, स्पीकर नसला तर 100 रुपये, बोर्ड नसला तर प्रतिदिन 100 रुपये, घंटागाडीत कचरा झाकून न नेल्यास प्रतिदिन 100 रुपये, जीपीएस यंत्रणा बंद असल्यास प्रतिदिन 200 रुपये असी दंडाची तरतूद आहे. परंतु शहरात सध्या घंटागाडय़ाकडून विलीनीकरण होत नाही. कचरा तसाच नेला जात आहे. एकाही नगरसेवकांकडून याविरोधात आवाज उठवला जात नाही. त्यामुळे नगरसेवकांचे आणि ठेकेदारांचे साठेलोटे आहे काय असाही सवाल उपस्थित होत आहे.
शहरात जे करोना बाधीत रुग्ण आढळून येत आहेत. त्या भागात मायक्रो कंटेटमेंट झोन होत आहे. तेथील कचरा गोळा करण्यासाठी वेगळी सोय करण्यात आली नाही. तोही कचरा नेहमीच्याच घंटागाडीत टाकला जात असून तो कचरा सोनगाव कचरा डेपोत पडत आहे. सोनगाव कचरा डेपोत सध्या खाजगी कचरा वेचक फिरत आहेत. त्या कचरा वेचकांना या कचरामुळे कोरोनाची बाधा होवू शकते. त्याकरता पालिकेच्या अधिकाऱ्यांची पुरती डोळेझाक आहे. हे खाजगी कचरा वेचक काही भंगार व्यावसायिकांनी सोनगाव कचरा डेपोत सोडले गेले आहेत. त्यामुळे शहरात पुन्हा कोरोनाचा धोका वाढण्याची भिती काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.