स्थैर्य, सातारा, दि.१२ : विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीची आचारसंहिता लागू असताना प्रभागामध्ये डस्टबीनचे वाटप करून आचारसंहिता भंग केला. या आरोपावरून भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका सिद्धी पवार यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विधान परिषदेच्या पुणे पदविधर मतदार संघांची निवडणूक जाहीर झाली आहे. १ डिसेंबरला त्यासाठी मतदान होणार आहे. या मतदार संघात सातारा जिल्ह्याचाही समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातही २ नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमांवर काही बंधणे आली आहेत. असे असतानाही भाजपच्या नगरसेविका सिद्धी पवार यांनी आपल्या प्रभागात डस्टबिनचे वाटप करून आचारसंहिता भंग केला असल्याचे शाहूपुरी पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर शाहुपूरी पोलीस ठाण्यातील गोपनिय विभागाचे हवालदार धनंजय कुंभार यांनी त्यांच्या विरोधात फिर्याद दिली.