
स्थैर्य, 18 फेब्रुवारी, सातारा : मसाप, पुणे, शाहूपुरी शाखेच्या माध्यमातून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी पाठपुरावा करणारे, युगप्रवर्तक कवी बा.सी. मर्ढेकर यांच्या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या घरांचे नूतनीकरण करुन स्मारकात रुपांतर करणारे, मराठी भाषेसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारे आणि साता-यात तब्बल 32 वर्षानंतर 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन करणारे मसाप, पुणेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांना महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभागाच्या वतीने अत्यंत प्रतिष्ठेचा मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार 2025 जाहीर झाला आहे. मराठी भाषा गौरव दिनी म्हणजे शुक्रवारी 27 फेब्रुवारीला या पुरस्काराचे मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ कवी, साहित्यिक मंगेश पाडगावकर यांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. मराठीत बालसाहित्य, कविता, गीतलेखन, अनुवाद, ललितगद्य आदी लेखन त्यांनी केले. भाषा ही बोलण्या- गाण्यातून प्रवाही राहते. भाषेला असेच प्रवाही ठेवण्याचे कार्य सातत्याने करणा-या व्यक्तीस महाराष्ट्र शासनाच्यावतीने प्रतिवर्षी मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. शासनाचा 2025 चा पुरस्कार मराठी भाषेसाठी गेल्या 15 वर्षांपासून सातत्याने कार्यरत असणारे मसाप,पुणेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांना जाहीर करण्यात आला आहे. दोन लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्कारचे स्वरुप आहे.
विनोद कुलकर्णी यांनी 15 वर्षापूर्वी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेची स्थापना केली. शाहूपुरी शाखा स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्रातील पहिला मराठी भाषा पंधरवडा सुरु केला. मराठी भाषा दिन साजरा व्हावा यासाठी विशेष प्रयत्न केले. सलग 14 वर्षे मराठी भाषा पंधरवडा सुरु ठेवला. साहित्याच्या व्यासपीठावरुन सामाजिक कार्याला देणगी देण्याचा पायंडा पाडला. मा. प्रकाश आमटे, डॉ.रविंद्र कोल्हे यांच्या कार्याला हातभार लावला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करणारी 1 लाख पत्रे सातारा जिल्हयाच्यावतीने पाठवली. दिल्ली येथे धरणे आंदोलन केले. अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. युगप्रवर्तक कवी बा.सी. मर्ढेकर यांच्या पडझड झालेल्या आणि नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या घराचे नूतनीकरण केले आणि त्याचे स्मारकात रुपांतर केले. सातारा जिल्हयातील साहित्यिकांचे त्यांच्या जन्मभूमीत, कर्मभूमीत पुतळा उभारण्याचे काम सुरु केले. “मोठ्या बँकेची छोटी गोष्ट’ हे पुस्तके लिहिले. कवी बा.सी.मर्ढेकर यांचे चरित्र लेखन केले असून ते पुस्तकही प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद निवडणुकीऐवजी सन्मानाने मिळावे यासाठी अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या घटनादुरुस्तीसाठी पुढाकार घेतला आणि ती घटनादुरस्ती अंमलात आणली, त्यामुळे अनेक मातब्बर लेखकांना सन्मानाने अध्यक्षपद मिळाले. अमळनेर येथे झालेल्या 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा देण्यासंदर्भात अभिरुप न्यायालयात मराठी जनतेच्या वतीने जोरदार बाजू मांडली. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या संस्थेची स्वायत्ता टिकावी आणि व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला येऊ नये यासाठी सर्वस्व पणाला लावून भूमिका घेतली. साता-यात तब्बल 32 वर्षानंतर 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केले. शासनाने या सर्व कामांची दखल घेऊन श्री. कुलकर्णी यांना हा पुरस्कार जाहीर केला आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री.कुलकर्णी यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
अशीच अभिमानास्पद कामगिरी घडत राहील
या पुरस्काराबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि निवड समितीचे मी मनापासून आभार मानतो. माझ्या या वाटचालीमध्ये बांधकाममंत्री श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, खा.श्री.छ. उदयनराजे भोसले, रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले, विधानपरिषद उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, ज्येष्ठ मार्गदर्शक रवींद्र बेडकिहाळ, मसापचे राज्यातील सर्व जिल्हा प्रतिनिधी, सर्व शाखांचे प्रमुख, मसाप, पुणे शाहूपुरी शाखा, मावळा फौंडेशन आणि सातारा जिल्हयातील सर्व सहका-यांचा वाटा आहे, या सर्वांविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. माझ्या हातून अशीच अभिमानास्पद कामगिरी घडत राहील, अशी ग्वाही देतो.
– विनोद कुलकर्णी, (कोषाध्यक्ष, मसाप, पुणे)
