
स्थैर्य, लोणंद, दि. 30 : तांबवे, ता. फलटण येथील करोना संशयीत वृद्धावर लोणंद नगरपंचायत हद्दितील लोणंद-कापडगाव रोडवरील खोतमळा येथील स्मशानभूमीत दहन करण्यास या ठिकाणच्या नागरीकांनी प्रशासनास तीव्र विरोध दर्शविला. परंतु आपल्या भावना वरिष्ठांना कळविण्यात येतील, असे आश्वासन दिल्यानंतर या वृद्धावर करोना प्रोटोकॉल नुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.
लोणंद नगरपंचायतीने कोरोनाबाधिताच्या अंत्यसंस्कारासाठी आरक्षित केलेल्या खोत मळा येथील भूमीत लोणंद पोलीस स्टेशन हद्दितील सुमारे 56 गावातील करोना बाधितांवर अंत्यसंस्कार करण्याच्या अजब फतव्याला खोतमळा व कापडगाव ग्रामस्थांकडून तीव्र विरोध करुन या ठिकाणी अन्य गावातील करोना बाधितांवर अंत्यसंस्कार करू नयेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
तांबवे, ता. फलटण येथे मुंबईवरुन आलेल्या 95 वर्षाच्या इसमावर अंत्यविधी करोना प्रोटोकॉलनुसार काल रात्री लोणंद नगरपंचायत यंत्रणेमार्फत लोणंद नगरपंचायत हद्दीतील आरक्षित करण्यात आलेल्या खोतमळा येथील स्मशानभूमीत करण्यात येत होते. यावेळी लोणंदचे नगराध्यक्ष सचिन शेळके पाटील, मुख्याधिकारी हेमंत ढोकले, सपोनि. संतोष चौधरी व नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी स्मशानभूमीलगत असणार्या खोतमळा येथील नागरिकांनी सर्व पदाधिकारी व अधिकार्यांना घेराव घालून ज्या गावातील इसम मृत पावला आहे त्याचा अंत्यविधी त्याच गावात झाला पाहिजे, अशी मागणी करुन हा अंत्यविधी आम्ही येथे होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली. या इसमाचा अंत्यविधी करोना च्या सर्व प्रोटोकॉल नुसार येथेच केला जाईल. आपले म्हणणे वरिष्ठ कार्यालयास कळविण्यात येईल, असे तोंडी आश्वासन दिल्यानंतर अंत्यविधी उरकण्यात आला. या अंत्यविधीसाठी लागणारा संपूर्ण खर्च विरोधी पक्षनेते राजेंद्र डोईफोडे यांनी देऊन पुन्हा एकदा सामाजिक बांधीलकी जपली. खोत मळा येथील ग्रामस्थांनी अंत्यसंस्कार करण्यास विरोध केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता परंतु पदाधिकारी व अघिकार्यांनी समजाऊन सांगितले नंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. परंतु या पुढे या ठिकाणी अंत्यसंस्कार करू दिले जाणार नसल्याचा इशारा नागरीकांनी दिला.
लोणंद – कापडगाव या रस्त्यालगत ओढयात उघड्यावर असणार्या स्मशानभूमीत करोना बाधितावर अंत्यसंस्कार केल्याने नागरीकांच्या आरोग्याला धोका पोहचत आहे त्यामुळे या ठिकाणी कोरोना बाधीतावर अंत्यसंस्कार करु नये, अशी मागणी खोतमळा व कापडगाव येथील ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे, की खोत मळा येथील स्मशानभूमी बंदिस्त नसुन खुली आहे. तर खोत मळा व कापडगाव या गावातील लोकवस्तीजवळ आहे. त्यामुळ कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका अधिक आहे. स्मशानभूमी बंदिस्त नसल्याने भटकी कुत्री, पाळीव प्राणी, जंगली प्राणी यांच्यामुळे या मृतदेहाची विटंबना व करोना संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. या स्मशानभूमीपासून काही फुट अंतरावर लोणंद – कापडगाव रस्ता असून या रस्तावरून खोतमळा, कापडगाव, चांभारवाडी, आरडगाव, हिंगणगाव आदी गावातील नागरीकांची मोठया प्रमाणावर ये जा केली जात असते. तर या स्मशानभूमी जवळच सरदेच्या ओढ्यावर बंधारा आहे. या बंधार्यातील पाण्याचा वापर खोत मळा, कापडगाव येथील नागरीक धुणी भांडी, जनावरे पाणी पिण्यासाठी करीत असतात. सध्या दुसरीकडे कुठेही पाणी नसल्याने याच पाण्याचा वापर केला जात आहे. त्यामुळे या भागातील नागरीकांना करोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. शासन करोना चा संसर्ग होऊ नये म्हणून प्रयत्न करीत असतानावरील सर्व धोक्यांचा विचार करून या ठिकाणच्या स्मशानभूमीत करोना बाधित रुग्णाचे दहन करू नये, अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली आहे. दरम्यान, लोणंद नगरपंचायतीच्या प्रभाग सतरा मधील खोत मळा येथील स्मशानभूमीत लोणंद पोलीस स्टेशन हद्दितील 56 गावातील कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार केल्याने पाणी दूषित होऊन जीविताला धोका होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येऊ नयेत. ज्या त्या गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी बांधकाम सभापती सौ. दीपाली क्षीरसागर यांनी दिला आहे.