स्थैर्य, सातारा, दि. 20 : लॉकडाऊन दरम्यान ग्रामसुरक्षा समित्यांनी प्रत्येक गावात वार्डनिहाय समित्या नेमून ग्रामस्थांचे प्रबोधन करावे. पराजिल्ह्यातून येणाऱ्या लोकांचे क्वारंटाईनबाबत माहिती घेऊन त्याची नोंद वरिष्ठांकडे करावी. त्याचबरोबर विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी असे प्रतिपादन सातारा तहसीलदार आशा होळकर यांनी केले.
नागठाणे व अपशिंगे (मि.) ता. सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या कोरोना रोगाच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी बोरगावचे स.पो.नि. डॉ. सागर वाघ उपस्थित होते. यावेळी त्या म्हणाल्या की, ग्रामसुरक्षा समित्यांनी कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर गावांतर्गत कोणतेही राजकारण न करता प्रशासनाने नेमुन दिलेली कामे योग्य पद्धतीने पार पाडावी. यामध्ये गावच्या हिताचे निर्णय घेण्यात त्यांना मान्यता देण्यात येत आहे. परजिल्ह्यातून वैध-अवैध मार्गाने येणाऱ्यांचे सक्तीने विलगिकरण करावे व त्याची माहिती प्रशासनाला वेळोवेळी द्यावी.
ज्या व्यक्ती क्वारंटाईन करूनही समाजात वावरत असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. रेशनिंग वाटप करताना कोणताही काळाबाजर होणार नाही याची दक्षता घेत समाजातील सर्व स्तरातील जनतेला रेशनिंग पोहच होईल याची दक्षता या समितीने घ्यावी.परिसरातील सरकारी व खाजगी डॉक्टर, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांनी जनतेला आरोग्यविषयक जनजागृती करावी व त्याचबरोबर स्वतःच्या आरोग्याची काळजीही घ्यावी असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी स.पो.नि. डॉ. सागर वाघ यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. आढावा बैठकीस नागठाणे व अपशिंगे (मि.) येथील मंडलाधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, प्रत्येक गावातील ग्रामसुरक्षा समित्यांचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.