दैनिक स्थैर्य । दि. ५ जुलै २०२१ । फलटण । आपल्या देशाची प्रगती होऊन देशाची लोकशाही बळकट होण्यासाठी खेळाडूंबरोबर गावा गावात सनदी अधिकारी निर्माण झाले पाहिजेत, असे मत जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांनी व्यक्त केले.
सरडे ता.फलटण येथील प्रविण जाधव या खेळाडूची आँलंपिक स्पर्धेत निवड झाल्याबद्दल फलटण तालुका पोलिस पाटील संघटनेच्यावतीने प्रविणच्या आईवडीलांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी मेहता बोलत होते. यावेळी पोलिस पाटील संघटनेचे राज्य उपाध्यक्ष हणमंत सोनवलकर, तालुका अध्यक्ष शांताराम काळेल उपस्थित होते.
आज आपल्या देशाला चांगल्या खेळाडूंची गरज आहे त्याचबरोबर आपल्या वेदना अडचणी समजून घेणार्या ग्रामीण भागातील सनदी अधिकारी युवकांची गरज आहे. देशातील लोकशाही ठरावीक प्रदेशातील अधिकारी चालवित आहेत. आपल्या समस्या त्यांना आजपर्यंत समजल्या नाहीत. खर्या अर्थाने देशाची प्रगती करायची असेल तर गावातील युवक वर्गाने खेळाबरोबरच स्पर्धा परीक्षांकडे लक्ष दिले पाहिजे. सरडे गाव यापुढे खेळाडूंचे गाव म्हणून ओळखले जाईल त्याप्रमाणेच अधिकारी वर्गाचे गाव म्हणून ओळख होण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन मेहता यांनी केले.
प्रविण जाधव या खेळाडूला घडविण्यासाठी त्याचे शिक्षक विकास भुजबळ, वडील रमेश जाधव व आई सविता जाधव यांचे मोठे योगदान आहे. हालाखीच्या परिस्थितीवर मात करून त्याने धर्नुविद्या या भारतीय संस्कृतीच्या खेळात प्राविण्य मिळवून आज तो देशाचे प्रतिनिधित्व करीत आहे. त्याच्या कामगिरीमुळे सरडे गावाचे नाव उज्ज्वल झाले असल्याचेही, मेहता यांनी नमूद केले.
प्रविण जाधवचे यश आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. सामान्य कुटुंबातील युवकांने आपल्या गावाचे नाव जागतिक पातळीवर पोहचविले आहे. सरडे गावचे व आमचे ऋणाबंध कायम आहेत. प्रविणच्या आई वडीलांनी केलेले कष्ट कायमस्वरूपी नवीन खेळाडूंसाठी दिशादर्शक राहतील, असे मत हणमंतराव सोनवलकर यांनी व्यक्त केले.
प्रारंभी प्रविणचे वडील रमेश जाधव व आई सविता जाधव यांचा यथोचित सत्कार पोलिस पाटील संघटनेच्या वतीने करण्यात आला.
यावेळी शांताराम काळेल, आसूचे पोलीस पाटील गोडसे यांची समयोचित भाषणे झाली. उपस्थितांचे स्वागत व सुत्रसंचालन माजी सरपंच दत्ता भोसले यांनी केले तर आभार पोलीस पाटील मनोज मोरे यांनी केले.
यावेळी हणमंत अहिवळे – विचुर्णी , ज्ञानदेव गाडे – हणमंतवाडी, अमोल नाळे – तिरकवाडी, हणमंत सोनवलकर – भाडळी, दत्तात्रय सरक – मिरगाव, विश्वास काकडे – साठे, हणमंत बिचुकले – शेरेशिंदेवाडी, संजय जाधव, शरद भंडलकर, बापू शेंडगे, आण्णा डोंबाळे, पप्पू जाधव, अशोक जाधव, आण्णा भंडलकर आदी मान्यवर उपस्थित होते.