स्थैर्य, दि. २७: अहिल्यादेवींच्या स्मारकासाठी राज्य शासनाने निधीची तरतूद करावी, स्मारकाच्या भुमीपूजनाची तारीख जाहीर करावी, तसेच अहिल्यादेवी अध्यासनासाठी तरतूद करावी, या मागण्यांसाठी विक्रम ढोणे यांनी सोमवारी सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती, तरीही ढोणे उपोषणावर ठाम राहिले. सकाळी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली, मात्र त्यात ठोस आश्वासन मिळाले नाही. त्यामुळे ढोणे यांनी उपोषण सुरूच ठेवले. दिवसभरात सोलापूरातील मान्यवरांनी उपोषणस्थली भेट देवून पाठिंबा दिला. रात्री प्रशासनाने याप्रश्नी तोडगा काढण्याची भुमिक घेतली. त्यानुसार रात्री 11 वाजता पालकमंत्री दत्तात्रेय भरणे व ढोणेंची चर्चा विश्रामधामावर झाली. यावेळी महिनाभरात स्मारकाची प्रक्रिया सुरू होईल. मी पालकमंत्री आहे, काळजी करू नका, असे भरणे यांनी सांगितले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
यासंबंधाने ढोणे यांनी सांगितले की, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्मारकासाठी शासकीय निधी देण्याची घोषणा केली, त्याला पाच महिने झाले, मात्र पुढे काही घडले नाही. याविषयात सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. तसे आवाहनही आम्ही केले होतो. आता उपोषण केल्यानंतर त्यांनी महिनाभरात प्रक्रिया सुरू करू, असे ठोस आश्वासन दिले आहे. पालकमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे घडावे, अशी इच्छा आहे. तसे घडले नाही तर पुन्हा आम्हाला आंदोलनात्मक भुमिका घ्यावी
लागेल. या प्रश्नाचा पाठपुरावा आम्ही कायम ठेवणार असल्याचे ढोणे यांनी सांगितले.