दैनिक स्थैर्य | दि. 09 जानेवारी 2024 | फलटण | दैनिक सत्य सह्याद्रीचे फलटण तालुका प्रतिनिधी विक्रम चोरमले यांना ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’तर्फे देण्यात येणार्या ‘दर्पण’ पुरस्कारांने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना.रवींद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.
पोंभुर्ले, ता.देवगड, जि.सिंधुदुर्ग येथे संस्थेने उभारलेल्या ‘दर्पण’ सभागृहात शनिवार, दि.6 जानेवारी 2024 रोजी राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी मराठवाडा विभाग साहित्य परिषद, नांदेडचे अध्यक्ष डॉ.जगदीश कदम, रत्नागिरी येथील ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ लिमये महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ पोंभुर्ले – जांभे – देऊळवाडी ग्रामस्थ आणि जांभेकर कुटूंबिय इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
राज्यस्तरीय पत्रकार दिनानिमित्त दरवर्षी प्रमाणे संस्थेच्या पोंभुर्ले (जि.सिंधुदुर्ग) येथील ‘दर्पण’ सभागृहात बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन व राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण केले. यंदा या पुरस्कारांचे 31 वे वर्ष असून या समारंभात सन 2023 च्या प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय यामध्ये ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर जीवन गौरव पुरस्कार माधव कदम (सिंधुदुर्ग), राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कार प्रशांत कदम (नवी दिल्ली), सागर देशपांडे (पुणे), कैलास म्हापदी (ठाणे), श्रीकांत कात्रे (सातारा), ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील (कराड) पुरस्कृत राज्यस्तरीय ‘धाडसी पत्रकार’ पुरस्कार – सौ.कृतिका पालव (मुंबई), साहित्यिक गौरव पुरस्कार – डॉ.भगवान अंजनीकर (नांदेड), विशेष ‘दर्पण’ पुरस्कार – शशिकांत सोनवलकर (दुधेबावी, ता.फलटण), विक्रम चोरमले (फलटण) इत्यादी मान्यवरांना वरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
‘दर्पण’कारांच्या जन्मभूमीत ‘दर्पण’ स्मारक सभागृहात आयोजित केलेल्या या ऐतिहासिक कार्यक्रमास ‘दर्पण’कारांना अभिवादन करण्यासाठी राज्यातील पत्रकार, विविध क्षेत्रातील मान्यवर, माध्यमप्रेमी नागरिक व पोंभुर्ले पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव व कृष्णा शेवडीकर, पोंभुर्ले गावच्या सरपंच सौ.प्रियांका धावडे, उपसरपंच सादिक डोंगरकर इत्यादी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.