
स्थैर्य, 29 जानेवारी, सातारा : आपल्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांनी आणि अफझलखान कबर मुक्ती आंदोलनातील ऐतिहासिक योगदानाने संपूर्ण महाराष्ट्रात ओळख निर्माण करणार्या ज्येष्ठ सामाजिक नेत्या विजयाताई भोसले यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने सातारा जिल्ह्याच्या सामाजिक आणि राजकीय पटलावरील एक झुंजार नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अफझलखान कबर परिसरातील अतिक्रमण हटवण्यासाठी झालेल्या दीर्घकालीन लढ्यात विजयाताईंनी अत्यंत महत्त्वाची आणि सक्रिय भूमिका बजावली होती. अनेक वर्षांच्या या संघर्षात त्यांनी कार्यकर्त्यांचे समर्थपणे नेतृत्व केले आणि आंदोलनाला नवी दिशा दिली.
विजयाताईंची विशेष ओळख म्हणजे त्यांचा कायम आनंदी आणि हसतमुख स्वभाव. अत्यंत कठीण प्रसंगात आणि आंदोलनाच्या तणावपूर्ण वातावरणातही त्या नेहमी हसत खेळत कार्यकर्त्यांना धीर देत असत. त्यांच्या या स्वभावामुळे केवळ वाईच नव्हे, तर संपूर्ण सातारा जिल्ह्यातील तरुण पिढी आणि महिला मोठ्या संख्येने त्यांच्याशी जोडल्या गेल्या होत्या. त्या केवळ एक नेत्या नव्हत्या, तर कार्यकर्त्यांसाठी एक मातृसमान आधारस्तंभ होत्या. हिंदू संस्कृतीचे रक्षण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार हेच त्यांच्या जीवनाचे मुख्य ध्येय राहिले.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच वाई आणि परिसरातील जनजीवन हळहळले असून विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. महिला संघटन, सामाजिक प्रश्न आणि हिंदुत्ववादी चळवळीसाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने वाई परिसरातील एका धगधगत्या पर्वाचा अंत झाला असून सर्वसामान्यांनी एक आपला माणूस गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
श्रीमती विजयाताई भोसले परिचय व कार्य महत्वाचा दिवसः 26 ऑक्टोबर विविध पदे व सामाजिक कार्यः कौटुंबिक पार्श्वभूमीः बावधन गावच्या स्नुषा. शैक्षणिक क्षेत्रः सन 1980 ते 1985 या काळात राहुरी कृषी विद्यापीठ येथे ’सिनेट सदस्या’ म्हणून कार्य केले. प्रसार माध्यमः सन 1985 ते 1987 दरम्यान पुणे आकाशवाणीच्या सल्लागार समितीच्या सदस्या होत्या.
शासकीय समित्याः * सन 1995 ते 2000 या काळात महाराष्ट्र राज्याच्या ’स्वातंत्र्यसैनिक उच्चाधिकार समितीच्या’ सदस्या. सन 1995 ते 2000 दरम्यान महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (चडठढउ), सातारा विभागाच्या सल्लागार समितीच्या सदस्या. सहकार क्षेत्रः बावधन विकास सेवा सोसायटीमधून महाराष्ट्रातील पहिली महिला चेअरमन होण्याचा बहुमान त्यांनी मिळवला. राजकीय कार्यः भारतीय जनता पक्षाच्या माजी महिला मोर्चा उपाध्यक्ष.
सांस्कृतिक कार्यः1994 साली ’प्रतापगड उत्सव समिती’ची स्थापना केली. 1994 पासून आजपर्यंत प्रतापगड उत्सव समितीच्या निमंत्रक पदावर कार्यरत. सन्मानः हिंदुत्ववादी व गोरक्षक कार्यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या संस्था व प्रतिष्ठानांकडून विविध पुरस्कार व मानपत्रे देऊन त्यांना गौरवण्यात आले आहे

