दैनिक स्थैर्य । दि. १६ जानेवारी २०२३ । सांगली । कोरोना व संपामुळे एस. टी. महामंडळासमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. तथापि, राज्य शासन एस. टी. महामंडळ व एस. टी. कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. त्यासाठी राज्य शासनाने एस. टी. महामंडळाला 300 कोटी रुपये देऊ केले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मिरज आगारामध्ये अपघात सुरक्षितता अभियान दिनांक 11 ते 25 जानेवारी 2023 पर्यंत राबविण्यात येत आहे. त्याचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा वाहतूक अधिकारी वृषाली भोसले, आगार व्यवस्थापक श्री. हेतंबे तसेच एस. टी. महामंडळाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, रस्ते वाहतुकीत सरक्षित प्रवास हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे हे प्रवाशांची सुरक्षित वाहतूक सेवा करणारे महामंडळ आहे. बस अपघात टाळण्यासाठी महामंडळाकडून नियमितपणे अपघात नियंत्रण उपाययोजना करण्यात येतात. त्याअंतर्गत हे अपघात सुरक्षितता अभियान दिनांक 11 ते 25 जानेवारी 2023 पर्यंत राबविण्यात येत आहे. एस. टी. चालक व वाहकांनी प्रवाशांची संपूर्ण सुरक्षा लक्षात घेऊन वाहने चालवावीत व दक्षता घ्यावी. मिरज आगार व मिरज बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला असून लवकरच त्यासाठी निधी उपलब्ध होणार आहे. असेही पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी सांगितले.