
थेट WhatsApp वर मिळवा
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या पशुवैद्यक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या मानधनात मोठी वाढ करण्यात आली असून, आता त्यांना दरमहा १८ हजार रुपये निर्वाह भत्ता मिळणार आहे.
स्थैर्य, सातारा, दि. ०५ नोव्हेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पशुवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय पशुचिकित्सा परिषदेच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील पशुचिकित्सालयात एक वर्ष सेवा देणे अनिवार्य असते, यादरम्यान मिळणारा भत्ता वाढवण्याची मागणी केली जात होती.
विद्यार्थ्यांना मिळणार आर्थिक दिलासा
पूर्वी या विद्यार्थ्यांना निवास, भोजन आणि प्रवासासाठी प्रतिमहिना ११ हजार रुपयांचा निर्वाह भत्ता दिला जात होता. आता यामध्ये वाढ करून तो १८ हजार रुपये करण्यात आला असून विद्यार्थ्यांना ७ हजार रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळणार आहे. या वाढीव निधीपैकी १५ हजार रुपये राज्य सरकारकडून दिले जाणार असून उर्वरित ३ हजार रुपये भारतीय कृषि अनुसंधान परिषद आणि विद्यापीठाच्या स्वनिधीतून उपलब्ध केले जातील.
ग्रामीण आरोग्य सेवेला मिळणार बोग
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून ते अधिक आत्मविश्वासाने ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय रुग्णालयांमध्ये सेवा देऊ शकतील. परिणामी, शेतकरी व पशुपालकांना आपल्या जनावरांच्या आरोग्यासाठी अधिक चांगल्या सुविधा मिळण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.





