नवीन प्रभाग रचनेची दिग्गजांना धास्ती; कुणीच म्हणेना ‘मी पुन्हा येईन’ !

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. 08 फेब्रुवारी 2022 । फलटण । प्रसन्न रुद्रभटे । आगामी नगरपरिषदेच्या निवडणूकीसाठी फलटण शहरातील सर्व प्रभागांची फेररचना होणार आहे. या नूतन प्रभाग रचनेचे सर्वांनाच वेध लागले असून मागील निवडणूकीपेक्षा यंदा प्रभाग रचनेत मोठे बदल होणार असल्याचे बोलले जात असल्याने अनेक दिग्गजांनी याची चांगली धास्ती घेतली आहे. आपला हक्काचा भाग दुसर्‍या प्रभागाला जोडला जाण्याच्या भितीने ‘मी पुन्हा येईन’ असे कुणालाच ठामपणे म्हणता येत नसून सगळ्यांच्या नजरा प्रभाग रचनेच्या घोषणेकडे लागून राहिल्या आहेत.

संभाव्य प्रभाग रचना ही द्विसदस्यीय असणार असून प्रभाग संख्येत वाढ होवून नगरसेवकांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच बहुचर्चित ओबीसी आरक्षणाबाबतही निकाल प्रलंबित असल्याने याकडेही अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. नवीन प्रभाग रचना कशी असेल आणि कधी जाहीर होईल याबाबत कसलीही अधिकृत माहिती उपलब्ध नसली तरीही शहरातील चौकाचौकात प्रभाग रचनेवरुन चर्चा रंगताना दिसत आहे. या प्रभाग रचनेमुळे सत्ताधार्‍यांबरोबरच विरोधकांचाही फायदा होणार असल्याचे अंदाज बांधले जात आहेत. मात्र प्रभागांच्या संभाव्य उलथा-पालथीमुळे कुणीच आपली दावेदारी सांगू शकत नसून प्रभाग रचनेच्या घोषणेनंतरच आगामी निवडणूकीच्या हालचालींना वेग येणार आहे.


Back to top button
Don`t copy text!