फलटण तालुक्यासाठी आमदार फंडातून व्हेंटिलेटर उपलब्ध करून द्यावेत : आमदार दीपक चव्हाण


स्थैर्य, फलटण : सध्या राज्यासह आपल्या जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. फलटण तालुक्यामध्ये व्हेन्टिलेटरची कमतरता आगामी काळात जाणवू नये या साठी फलटण तालुक्यासाठी आमदार निधीमधून व्हेन्टिलेटर उपलब्ध करुन द्यावेत, अशी मागणी आमदार दिपक चव्हाण यांनी केली.

कोरोना संसर्गाबाबत करत असलेल्या उपाययोजना आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आज पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, आमदार जयकुमार गोरे, आमदार दिपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे.  कुठलाही रुग्ण बेडपासून वंचित राहू नये म्हणून कोणत्या रुग्णालयात किती बेड उपलब्ध आहेत याची माहिती सहजपणे उपलब्ध व्हावी यासाठी एक अँप तयार करावा, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज केल्या. 

छत्रपती शिवाजी संग्रालयात 250 बेडचे कोविड रुग्णालय उभारण्यास शासनाने मान्यता दिली आहे. हे रुग्णालय  लवकरात लवकर कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरात येईल यासाठी कामांचे नियोजन करावे. तसेच प्रत्येक तालुकानिहाय कोरोना रुग्णांची संख्या संबंधित तालुक्यांच्या लोकप्रतिनिधींना द्यावी, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. पाटील यांनी बैठकीत केल्या.

तालुका वैद्यकीय अधिकारी तसेच संबंधित तालुक्यांच्या प्रांताधिकारी यांनी तालुक्यातील लोकप्रतिनिधींना कोरोना रुग्णांची संख्या रोजच्या रोज द्यावी. ज्यांना कोरोनाचा संसर्ग नाही इतर आजारांसाठी रुग्णालयात उपचारासाठी जात आहेत अशा रुग्णांना काही रुग्णांलयाकडून उपचार केले जात नाहीत त्यांना उपचार मिळण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. छत्रपती शिवाजी संग्रालयात उभारण्यात येणारे कोविड रुग्णालय तीन आठवड्याच्या आत सुरु करण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासन यांनी एकत्र येऊन कोरोनावर मात करावी, असे आवाहन  गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी बैठकीत केले.

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत त्यांच्या उपचार करण्यासाठी निवृत्त झालेल्या डॉक्टरांची मदत घ्यावी. ज्या कोरोना रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत, अशा रुग्णांच्या घरात व्यवस्था होईल का याची पाहणी करुन त्यांना घरातच उपचार घेण्यासाठी प्रवृत्त करावे. तसेच जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या बेडची माहिती प्रत्येक तालुक्याच्या आमदारांना द्यावी, अशा सूचना खासदार श्रीनिवास पाटील यांनी केल्या.

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना बेडची माहिती ऑनलाईन पद्धतीने व्हावी यासाठी एक कक्ष स्थापन करावा, अशा सूचना आमदार जयकुमार गोरे यांनी केल्या तर 

छत्रपती शिवाजी संग्राहलयात 250  बेडचे कोविड रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या रुग्णालयात कोण कोणत्या सुविधा असणार आहेत याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे बैठकीत दिली.

बैठकीनंतर पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, आमदार जयकुमार गोरे, आमदार दिपक चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी संग्रालयात उभारण्यात येणाऱ्या कोविड रुग्णालयाच्या कामाची पाहणी केली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!