
दैनिक स्थैर्य । 18 जून 2025 । सातारा। आगामी आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणार्या पालख्या तसेच भाविक आणि वारकर्यांसाठीच्या सोयी- सुविधा, त्यांच्या वाहनांना पथकारातून सूट देणे आणि वारी मार्गावरील रस्ते दुरुस्ती यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक संपन्न झाली होती. त्यानुसार वारी मार्गावर मानाच्या पालख्या, वारकर्यांसह भाविकांच्या वाहनांना पथकारातून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली आहे. तसेच रस्ते दुरुस्तीसह ठिकठिकाणी वारकर्यांना आवश्यक सोयी- सुविधा पुरवण्याच्या सूचना संबंधित विभागांना करण्यात आल्याचे ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी स्पष्ट केले असून याबाबत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ना. एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.
पंढरपूरला जाणार्या पालख्या, भाविक व वारकर्यांना ’आषाढी एकादशी 2025’, गाडी क्रमाांक, चालकाचे नाव असा मजकूर नमूद करुन आवश्यक त्या संख्येनुसार स्टिकर्स परिवहन विभाग, वाहतूक पोलीस/ पोलीस, संबंधित आर.टी.ओ. यांच्याशी समन्वय साधून पोलीस स्टेशन्स, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. ऑफिसेसमध्ये उपलब्ध करुन द्यावेत. पंढरपूरला जातेवेळी व परत येतेवेळी दि.18/6/2025 ते 10/7/2025 या कालावधीत ही सवलत पालख्या, भाविक व वारकर्यांच्या हलक्या व जड वाहनांसाठी असेल, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसे स्टिकर्स/ पासवर नमूद करण्यात येणार आहे. सदरचे पास परतीच्या प्रवासाकवरता ग्राह्य धरण्यात येतील याप्रमाणे स्टिकर्स तयार करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.
सर्व पथकर नाक्यावर स्वतंत्र पोलीस यंत्रणा ठेवणे तसेच परिवहन विभागाने जादा बसेस गाड्या सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाहतूक सुरळीत राहण्याच्या दृष्ट्टीकोनातून पथकर नाक्याजवळ पोलिसांची व्यवस्था करणे,सार्वजनिक बांधकाम विभागा, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत, डेल्टा फोर्स जास्त संख्येने तैनात करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. आपत्कालीनपरिस्थितीचा सामना करण्यासाठी मुांबई- पुणे द्रुतगती मार्ग तसेच राज्यातील इतर सर्व संबंधित रस्ते/ महामार्गावर रुग्णवाहीका व क्रेनची व्यवस्था करणे, मुंबई- कोल्हापूर बंगलोर, पुणे- सोलापूर आदी राष्ट्रीय मार्गावर सुद्धा क्रेनची व्यवस्था करण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकार्यांना देण्यात आले आहेत.
गरज भासल्यास सुरक्षित व सुरळीत वाहतुकीसाठी जड वाहनास आवश्यकता असल्यास बंदी घालण्याबाबत परिवहन विभागाने योग्य ती कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यभरातून पंढरपूरला जाणारे रस्ते (उदा. मुंबई मधील सायन ते पनवेल महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतर्गती मार्ग, मुंबई- बंगलोर राष्ट्रीय महामार्ग, पुणे-सोलापूर, पुणे-सातारा-कोल्हापूर ते राज्य सीमेपर्यंतचा महामार्ग, इ. महामार्ग तसेच मुंबई-पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग व मुंबई पुणे-सोलापूर राष्ट्रीय मार्गाला जोडणारे नवीन राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग, ग्रामीण रस्ते आदी रस्त्यांचे खड्डे भरणे, दुरुस्ती कामे, सुचना फलक लावणे आदी कार्यवाही त्या त्या यंत्रणांनी करणे.
राज्यातून पंढरपूरकडे येणार्या सर्व पथकर नाक्यांवर उपरोक्त कालावधीत पथकर माफी नसलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना पथकरातून सुट द्यावी व राज्य परीवहन विभागाच्या अधिकार्यांनी गरजेनुसार संबंधित पोलीस ठाणेकडे या अनुषंगाने कुपन/ पास प्राप्त करुन घ्यावेत. महाराष्ट्र राज्यभरातून पंढरपूरला जाणारे भाविक, वारकरी तसेच पालख्यांच्या वाहनाना संबंधित जिल्ह्यातील व शहरातील सर्व पोलीस ठाणे व वाहतुक विभाग/ शाखा/ चौकी येथून भाविकांच्या मागणीप्रमाणे पथकर माफ (टोल फ्री) पासचे वाटप करण्यात यावे.
ग्रामीण पोलीस/ आर.टी.ओ. यांचेमार्फत दिले जाणारे कुपन्स/ पावती यांची संख्या याबाबत एकत्रित माहिती संबंधित महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास/ सा.बां. विभाग/ छक-ख कार्यालये यांना माहितीकरीता सादर करावी. नाक्यांवर वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी जास्तीत जास्त मनुष्यबळ, ट्रॅफिक वॉर्डन व हँड होल्डींर्ग मशीन ठेवण्यात यावेत, पथकर कंत्राटदारांनी संबंधित रस्त्याच्या क्षेत्रात/ परिसरात वाहतुक पोलिसांसाठी आषाढी एकादशीच्या काळात जादाचे ट्राफिक वरदान डेल्टा किंवा एम.एस.एस. फोर्स उपलब्ध करुन द्यावेत. पोलीस व परिवहन विभागाने आषाढी एकादशीच्या काळात पास सुविधा आणि त्याच्या उपलब्धतेबाबतची माहिती जनतेस होण्याकरीत आवश्यकतेप्रमाणे अधिसूचना/ जाहीर प्रसिद्धी करावी. अशा सूचना सर्व संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. दिलेल्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून आषाढी एकादशी सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी योगदान द्यावे, असे आवाहन ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.