दैनिक स्थैर्य | दि. ३० ऑगस्ट २०२४ | फलटण |
मराठा रेजिमेंटमधील १९८८ साली श्रीलंका येथील ‘ऑपरेशन पवन’मध्ये शहीद झालेले तरडगाव (ता. फलटण) येथील जवान हणमंतराव गायकवाड यांच्या वीरपत्नी श्रीमती रुक्मिणी हणमंतराव गायकवाड यांना खामगाव येथील गट क्रमांक २९० मधील ५ एकर जमीन प्रशासनाकडून उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी कसण्यासाठी प्रदान केली.
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून वीरपत्नी श्रीमती रुक्मिणी हणमंतराव गायकवाड यांना ५ एकर जमीन कसण्यासाठी देण्यात यावी यासाठी शिफारस करण्यात आली होती. भारतीय सैन्यदलात किंवा सशस्त्र दलात कार्यरत असणार्या आणि महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असणार्या जवानांस अथवा अधिकार्यांस कोणत्याही युध्दात किंवा युध्दजन्य परिस्थितीत किंवा कोणत्याही लष्करी कारवाईत वीरमरण आल्यास, अशा जवानाच्या अथवा अधिकार्याच्या विधवा पत्नीस किंवा त्यांच्या कायदेशीर वारसास निर्बांधरित्या जमीन प्रदान करणेसाठी शासनाने दिनांक २८ जून २०१८ रोजीचे अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार वीरपत्नी श्रीमती रुक्मिणी हणमंतराव गायकवाड यांना ५ एकर जमीन कसण्यासाठी प्रदान करण्यात आली आहे.