दैनिक स्थैर्य । दि. ०८ जून २०२३ । बारामती । राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या बारामती तालुका उपाध्यक्षा रोहिणी खरसे- आटोळे यांनी सलग ३ वर्षे पारंपारिकतेला पर्यावरणाची जोड देऊन वृक्षारोपणाने वटपौर्णिमा साजरी करून वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
वटपौर्णिमेचा सण उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. महिला अत्यंत भक्तिभावाने वडाच्या झाडाचे पूजन करून हा सण साजरा करत असतात. मात्र बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष रोहिणी खरसे-आटोळे यांनी गेल्या तीन वर्षापासून डोर्लेवाडी परिसरात पारंपारिक सणाला पर्यावरणाची जोड देऊन वृक्षारोपण करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने वटपौर्णिमेचा सण साजरा केला आहे. न्यू इंग्लिश स्कूल विद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी मागील दोन वर्षे वृक्षारोपण करून वटपौर्णिमा साजरी केली होती व आता त्या रोपट्याचे उत्तम संवर्धन व संरक्षण केल्याने वृषा मध्ये रूपांतर होत आहे.
या वर्षी सेव्हन स्टार अकॅडमीच्या मैदानावर ३० झाडांचे वृक्षारोपण करून वटपौर्णिमा साजरी केली आहे. यावेळी अंगणवाडी सेविक तबसुम शेख, उषा निलाखे, सेव्हन स्टार अकॅडमीचे प्रमुख विजय काळकुटे, आदीसह महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. वृषरोपण केल्यानंतर खत, पाणी व ट्री गार्ड देऊन संवर्धन व संरक्षण ची जवाबदारी घेतली आहे पर्यावरण पूरक वटपौर्णिमा ही चळवळ होण्यासाठी प्रत्यनशील असल्याचे रोहिणी खरसे आटोळे यांनी सांगितले.