मुधोजी हायस्कूलच्या प्राचार्यपदी वसंतराव शेडगे यांची निवड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ५ फेब्रुवारी २०२५ | फलटण |
राजाळे येथील वसंतराव कृष्णा शेडगे (सर) यांची मुधोजी हायस्कूलच्या प्राचार्यपदी वर्णी लागली आहे. या निवडीबद्दल प्राचार्य शेडगे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

शेडगे सर यांचा जन्म फलटण तालुक्यातील पूर्वभागातील राजाळे येथील शेतकरी कुटुंबात झाला. प्राथमिक शिक्षण जि. प. प्राथमिक शाळेपासून सुरू झाले. त्यांच्या शैक्षणिक प्रवासात त्यांचे माध्यमिक शिक्षण श्री जानाई हायस्कूल, राजाळे येथे झाले, तर उच्च माध्यमिक शिक्षण मुधोजी कॉलेज फलटण येथे, पदवी तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती, पदव्युत्तर शिक्षण मुधोजी कॉलेज फलटण येथे झाले आहे.

त्यांनी शिक्षणशास्त्रात पदवी घेतल्यानंतर फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अनेक संस्थांमध्ये शिक्षणाचं पवित्र कार्य केले. यामध्ये (१९९३ ते २०००) सरलष्कर बहाद्दर श्रीमंत बाबाराजे खर्डेकर माध्यमिक विद्यालय हनुमंतवाडी, (२०००ते २००४) सालपे माध्यमिक विद्यालय सालपे, (२००४ ते २०१०) मुधोजी हायस्कूल फलटण, (२०१२ ते २०१७) सालपे माध्यमिक विद्यालय सालपे, रावडी माध्यमिक विद्यालय, (२०१७ ते २०२१) आदर्की माध्यमिक विद्यालय, आदर्की येथे उपशिक्षक या पदावर काम केले आहे. तसेच (२०२१ ते २०२३) मालोजीराजे शेती विद्यालय व जुनिअर कॉलेज येथे पर्यवेक्षक म्हणून काम केले असून (२०२३ ते २०२५) पर्यंत श्रीमंत सगुणामाता माध्यमिक विद्यालय, दालवडी येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. येथे त्यांनी प्राचार्यपदाची धुरा यशस्वीरित्या सांभाळली होती.

त्यांची दि. १ फेब्रुवारी २०२५ पासून फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व जुनिअर कॉलेज, फलटण येथे मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती झाली आहे. तसेच ते सातारा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष म्हणून २०२४ पासून आजअखेरपर्यंत कार्यरत आहेत. तसेच त्यांना सातारा जिल्हा मुख्याध्यापक संघामार्फत पीजी पाटील आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

फलटण शहरातील नावाजलेल्या व १५० वर्षांची परंपरा असलेल्या सातारा जिल्ह्यातील नामांकित आणि कोल्हापूर विभागात नावलौकीक असलेल्या व अनेक कवी, शास्त्रज्ञ अशा थोर व्यक्तींनी या विद्यालयात ज्ञानदानाचे व प्राचार्यपदाचे काम केले आहे. अशा मुधोजी हायस्कूलच्या प्राचार्यपदी त्यांची निवड झाल्याबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा विधान परिषदेचे माजी सभापती, विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, फलटण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन तथा फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी तथा महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम, तपासणी अधिकारी दिलीप राजगुडा, माजी प्राचार्य सुधीर अहिवले तसेच त्यांचे फलटणमधील अनेक राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह त्यांच्या मित्रमंडळींनी व राजाळे येथील ग्रामस्थानी अभिनंदन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!