दैनिक स्थैर्य | दि. २१ जून २०२३ | फलटण |
श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील महात्मा फुले चौक, फलटण येथे महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या श्रीराम विद्याभवनमधील चिमुकल्यांनी सादर केलेला विठ्ठल- रूक्मिणी देखावा पालखी सोहळ्यातील भाविक भक्तांसह दिंडीतील वारकर्यांना साक्षात विठुराया भेटल्याचा आनंद द्विगुणित करणारा ठरला. देखावा सादर करण्याचे शाळेचे १५ वे वर्ष आहे.
प्रारंभी संस्थेचे सचिव रवींद्र बेडकिहाळ यांनी सोहळ्याचा शुभारंभ केला. इ.७ वीतील विनय खोमणे याने ‘विठ्ठल’ आणि सिद्धी भोसले हिने ‘रुक्मिणी’चा पोशाख परिधान करून दर्शन सोहळा सादर केला.
यावेळी शहरातील भाविक भक्तांसह संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या दिंडीतील वारकर्यांच्या चेहर्यावर साक्षात विठ्ठल- रुक्मिणी भेटल्याचा आनंद ओसंडून वाहत होता.अनेकांना तर नतमस्तक होण्याचा मोह आवरता येत नव्हता. तसेच फोटो, सेल्फीसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या देखाव्यासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापक मनीष निंबाळकर यांच्यासह सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.