
स्थैर्य, 19 जानेवारी, सातारा – येथील अजिंक्यतारा किल्ल्याच्या पाठीमागील बाजूस असणार्या श्री खिंडीतील गणपती व कुरणेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने सालाबाद प्रमाणे माघ महिन्यातील गणेश जयंतीचा उत्सव संपन्न होत आहे .यानिमित्त
माघ शुद्ध पंचमीपर्यंत शुक्रवार दि.23 जानेवारीपर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष व विश्वस्त मंडळ यांच्या वतीने देण्यात आली आहे. या कार्यक्रमांमध्ये भजन, गायन, कीर्तन, अथर्वशीर्ष सहस्त्रावर्तने इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
या गणेश जयंती कार्यक्रमांमध्ये माघ शुद्ध द्वितीया 20 जानेवारी रोजी मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजता ‘मोगरा फुलला’ हा मराठी भक्ती गीतांचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर 21 जानेवारीला बुधवारी सायंकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळेत ब्रह्मवृंद मंत्रजागर करणार आहेत.
या गणेशजयंती कार्यक्रमांतर्गत मुख्य गणेश जयंतीचा सोहळा 22 जानेवारी रोजी माघ शुद्ध चतुर्थीला संपन्न होत असून गुरुवारी यानिमित्त दुपारी साडेबारा वाजता मंदिरात गणेश जन्मकाळ होऊन दुपारी चार वाजता सामूहिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम होणार आहे.
त्यानंतर सायंकाळी साडेपाच ते सात या वेळेत कला साधना प्रस्तुत भरतनाट्यम नृत्य कलाविष्कार संपन्न होणार आहे. सायंकाळी साडेसात ते 9 या वेळेत सप्तसूर सातारा आयोजित भावभक्ती गीतांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. 23 जानेवारी रोजी शुक्रवारी दुपारी साडेबारा ते तीन या वेळेत महाप्रसाद संपन्न होऊन दुपारी साडेचार ते सहा या वेळेत बाळासाहेब लोहार ,अतित व सहकारी यांचे भजन तसेच सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत भजन, आरती ,छबिना व लळीत भजनाचा कार्यक्रम होऊन उत्सवाची सांगता होणार आहे. या सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना सातारकर गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व तन मन,धन अर्पून हा उत्सव संपन्न करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
