स्थैर्य, सातारा, दि. ०५ : केंद्र शासनाच्या विविध विकासाच्या योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी. खास करुन ग्राम विकासाच्या योजनांवर भर द्यावा जेथे विकासाच्या योजना राबविण्यात अडचणी येतील त्या सोडविण्यासाठी केंद्र शासनाच्या विभागांशी समन्वय करुन सोडविल्या प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) अध्यक्ष तथा खासदार श्रीनिवास पाटील व सह अध्यक्ष खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिली.
केंद्र शासनाच्या योजनांचा सर्वसामान्यांना लाभ मिळण्यासाठी यासाठी सर्वांनी ज्ञानाचा व अनुभवाचा वापर करुन समन्वयाने काम करावे, असे आवाहन जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) सभेचे अध्यक्ष तथा खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.
जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठक जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात अध्यक्ष तथा खासदार श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. या बैठकीला समितीचे सह अध्यक्ष खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अविनाश फडतरे यांच्यासह समितीचे सदस्य व विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
आजच्या बैठकीत विकास कामांना येणाऱ्या अडचणी समूजन घ्या त्या अडचणी पुढील बैठकीत सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील. केंद्र व राज्य शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यावर सातारा जिल्हा नेहमीच अग्रस्थानी राहिला आहे. प्रत्येकाने आपल्या ज्ञानाचा वापर करुन केंद्र शासनाच्या योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवून सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमीका घ्यावी व योजना राबविण्यात आपला देशात प्रथम क्रमांक रहावा यासाठी प्रयत्न करावे, असेही अध्यक्ष तथा खासदार श्रीनिवास पाटील यांनी या बैठकीत सांगितले.
केंद्र शासनाच्या शासनाच्या योजना प्रत्येक लाभार्थीपर्यंत पोहचवा. विकासाबाबत काही नवीन कल्पना असतील त्या सांगा कल्पना केंद्र शासनाकडे मांडल्या जातील, असे सह अध्यक्ष तथा खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी या बैठकीत सांगितले. या बैठकीच्या प्रारंभी प्रत्येक विभागनिहाय कामांचा आढावा घेण्यात आला.