स्थैर्य, सातारा, दि.२० : साताऱ्यातील चिपळूणकर
बाग, दत्त मंदिर चौकात गुरुवारी मध्यरात्री काही जणांनी वाहनांची तोडफोड
करत वाहनांचे मोठे नुकसान केले. यात कार, दुचाकी वाहनांना लक्ष्य करत
वाहनांची मोडतोडही केली. प्राथमिक माहितीनुसार सहा ते सात वाहने फोडली असून
त्यामध्ये माजी नगराध्यक्षांच्या वाहनाचा देखील समावेश असल्याचे समजत
आहे.
मध्यरात्रीची ही घटना समोर आल्यानंतर शुक्रवारी पहाटेपासून परिसरात तणाव
होता. या घटनेमुळे शाहूपुरी पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह
उपस्थित होत आहे. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी पहाटे पोलिसांना माहिती
दिल्यानंतर ते तासभराने पोहोचले. त्यांनी घटनास्थळी पाहणी केली. नागरिकांनी
पोलिसांना संशयिताची माहिती दिल्यानंतर एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
मात्र, पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नागरिकांनी
नाराजी व्यक्त केली आहे.