
दैनिक स्थैर्य । दि. 02 डिसेंबर 2021 । फलटण । वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांचे संगठन करायचे आहे. अॅड.प्रकाश आंबेडकर यांचा आदेश अंतिम मानून सर्वांनी पक्षवाढीसाठी प्रयत्न करावेत. सातारा जिल्ह्यात वंचितची ताकद दिवसेदिवस वाढत असून आगामी निवडणूकीत पक्ष आपली ताकद दाखवून देईल, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी व्यक्त केला.
वंचित बहुजन आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल फलटण तालुका वंचित बहुजन आघाडीच्यावतीने चंद्रकांत खंडाईत यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
यावेळी ‘वंचित’ च्या फलटण तालुका युवक आघाडीची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये युवक आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी अॅड.जीवन पवार, युवती आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी काजल अशोक कांबळे, युवती उपाध्यक्षपदी पूजा शरद जगताप तसेच सचिवपदी मयुरी राजू गायकवाड यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमास ‘वंचित’चे सातारा जिल्हा उपाध्यक्ष गणेश कारंडे, जिल्हा महासचिव दादासाहेब केंगार, जिल्हा उपाध्यक्ष सुभाषराव गायकवाड, जिल्हा सचिव सुनील कदम, माण तालुकाध्यक्ष युवराज भोसले, अशोक भोसले, सातारा तालुकाध्यक्ष श्रीरंग वाघमारे, रणजीत मोहिते, माजी फलटण तालुका संघटक शामराव काकडे, माजी फलटण तालुकाध्यक्ष नितीन मोहिते, अमोल लोंढे, विजय कांबळे, विकास मोरे, मंगेश माने, सुखदेव शिंदे, अल्पसंख्यांक विभागाचे नेते निजामभाई आतार, महिला विभागाच्या माजी जिल्हा उपाध्यक्षा चित्राताई गायकवाड, फलटण शहराध्यक्ष सपनाताई भोसले, अश्विनीताई अहिवळे आदींसह तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड.जीवन पवार यांनी केले तर राहुल कांबळे यांनी आभार मानले.