‘सहयाद्री देवराई’चा व्हॅलेंटाईन डे राष्ट्रीय वृक्ष वडासोबत साजरा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१५ फेब्रुवारी २०२१ । सातारा । सुमारे शंभर वर्ष वयाच्या, पण मालकाला नकोशा झाल्याने कुऱ्हाड कोसळलेल्या हडपसरच्या वडाला साताऱ्यात पुनर्रोपणाद्वारे  जीवदान देण्यात अभिनेते सयाजी शिंदे यांच्या ‘सह्याद्री देवराई ‘ संस्थेला यश आले  ! वृक्षांचे मानवतेशी असलेले श्वासाचे नाते चिरंतन रहावे म्हणून  १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत  म्हसवे ( डी मार्ट जवळ,ता. सातारा ) येथे या वटवृक्ष सोबत अनोखा ‘व्हलेंटाईन डे ‘ साजरा करण्यात आला.२० हुतात्मा जवानांच्या  स्मृतीप्रित्यर्थ २० झाडे लावण्यात आली. वृक्षाची महती सांगणारी गाणी गाण्यात आली. कवी विठ्ठल वाघ यांनी ‘ झाड वडाचे ताठ उभे ‘ हे गीत या समारंभासाठी पाठवले होते. त्याचे गायन करण्यात आले.
 सहयाद्री देवराई संस्थेचे संस्थापक सयाजी शिंदे म्हणाले, ‘ अडचण होत आहे असे समजून वड कापायला निघालेल्या हडपसरच्या एका व्यक्तीकडून आम्ही शंभर वर्ष वयाचा हा वटवृक्ष शास्रोक्त पद्धतीने पुनर्रोपणासाठी हलवला. लांब ट्रकमधून साताऱ्याला गोळीबार मैदान,म्हसवे येथे नेवून  पुनर्रोपण केले. त्याला जीवदान मिळून पालवी फुटली आहे.व्हलेंटाईन डे ला आम्ही सर्व वृक्षप्रेमी नागरिक, वारकरी, विद्यार्थी या पालवी फुटलेल्या वटवृक्षा भोवती जमून त्याचे कोडकौतुक केले. रस्त्यांच्या कामात कापले जाणारे वृक्ष अशा पध्दतीने वाचवले पाहिजेत. सरकारनेही पुढाकार घेतला पाहिजे. रानाला आग लावणे, पेटवणे, वणवे प्रकार थांबले पाहिजेत. ‘ जंगल में फायर नही, फ्लॉवर होना चाहिए ‘ !
शंभर वर्षाचं झाड पुनरुज्जीवन करायला फक्त २५ हजार खर्च आला. अडचण होते, म्हणून  ही झाडं काढून टाकून देता कामा नये. हा तर राष्ट्रीय वृक्ष आहे , त्याचे सन्मानाने २६ जानेवारी रोजी म्हसवे ( सातारा ) येथे पुनर्रोपण करण्यात आले. निवडणुकीत जिंकला तरी एखाद्याची आपण मिरवणूक काढतो, इथे तर शंभर वर्षाचा राष्ट्रीय वृक्ष वाचला आहे. म्हणून त्याच्या पालवी सोबत प्रार्थना करण्यात आली. सुवासिनींनी पूजा केली. सयाजी शिंदे यांनी वटवृक्षाला अभिषेक केला.
संस्थेचे विश्वस्त धनंजय शेडबाळे म्हणाले, ‘ वडासारख्या मोठया झाडांना वाचवता येते, जीवदान देता येते, हा संदेश देण्यासाठी हा उपक्रम आम्ही व्हॅलेंटाईन डे दिवशी करतो आहोत. ‘
पानसरे नर्सरी ( श्रीगोंदा ) चे संचालक बाळासाहेब पानसरे यांनी या वटवृक्षाच्या पुनर्रोपणाच्या सर्व प्रक्रियेचे व्यवस्थापन केले. १४ फेबुवारी रोजी या कार्यक्रमात पुनर्रोपणाच्या तंत्राची माहिती देण्यात आली.
जिल्हा पोलिस प्रमुख अजय बन्सल,श्रीकांत इंगळहळीकर, धनंजय शेडबाळे,मुकेश धीवर, मनोज बाविसकर, सुजीत जगदाळे,बाळासाहेब पानसरे , भानुदास गायकवाड, डॉ. रोशनआरा शेख, प्रा. तानाजी देवकुळे, प्रा.केशव पवार, प्रा.डॉ. बाबासाहेब कांगुने, डॉ. सचिन माने, प्रा. रवींद्र महाजन, प्रा. रामचंद्र गाडेकर , राजेंद्र आफळे, प्रा. विजय निंबाळकर, शाहीर चरण उपस्थित होते. प्रा.सुजीत शेख यांनी सूत्रसंचालन केले.
सहयाद्री देवराई ‘ विषयी :
आतापर्यंत साधारण 22 देवराई , 1 वृक्ष बँक , 14 गड किल्ले या सोबतच राज्यभरात अनेक ठिकाणी किमान 4 लाखापेक्षा अधिक वृक्षारोपण करणाऱ्या सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई या संस्थेनं वृक्षारोपणाचा ध्यास घेतला आहे.
साताऱ्यातही अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून  दुर्मिळ झाडांचे जैवविविधता  उद्यान तयार केले जात आहे. उद्यानात ते मेहनत घेताना अनेकदा दिसून येतात. सह्याद्रीच्या पर्वत रांगामधील पश्चिम घाटामध्ये असणाऱ्या दुर्मिळ वनस्पती आणि वृक्ष त्याच बरोबर देशातील इतर राज्यातील 600 च्या वर असलेल्या दुर्मिळ वृक्षांच्या प्रजाती एकाच ठिकाणी लावण्याचा अनोखा प्रयोग साताऱ्यात सुरू करण्यात आला आहे. पुणे-बंगळुरु महामार्गालगत साताऱ्यातील म्हसवे गावाच्या बाजूला हा उपक्रम राबवण्यात येत आहे. महामार्गाजवळील पोलीस गोळीबार मैदानाच्या 30 एकर जागेत सह्याद्री देवराई, पोलीस प्रशासन आणि वनविभाग यांच्यावतीने हे अनोखे उद्यान उभारण्यात येत आहे. येथे २५ हजार रोपांची वृक्ष बँक उभारली आहे.

Back to top button
Don`t copy text!