वाईत कृष्णाबाई उत्सवास भव्य मिरवणूकीने प्रारंभ


स्थैर्य, 17 जानेवारी, सातारा : येथील श्री कृष्णाबाई संस्थान घाट, मधली आळी ऊर्फ सत्यनाथपुरी यांचा कृष्णाबाईचा उत्सव भव्य मिरवणुकीने सुरू झाला. पाच दिवस चालणार्‍या या उत्सवात विविध धार्मिक उपक्रमाबरोबरच भजन, कीर्तन अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

उत्सवानिमित्त सकाळी साडेआठ वाजता श्रींना लघुरुद्र व ब्रह्मवंदातर्फे श्रीसूक्त अभिषेक झाला. त्यानंतर दहा वाजता श्री. भट यांचे घरी मंत्रजागर झाल्यानंतर साडेअकरा वाजता ’श्री’ची मिरवणूक काढण्यात आली. या वेळी कृष्णामातेच्या मूर्तीची फुलांनी सजविलेल्यापालखीतून सवाद्य मिरवणूक म्हणजे ढोल ताशांच्या निनादात छबिना काढून आळीतून परिक्रमा पूर्ण करण्यात आली. उत्सवात रविवारी (ता. 25) सकाळी साडेआठ वाजता ’श्रीं’ना लघुरुद्र ब्रह्मवृंदातर्फे श्रीसुक्त अभिषेक, दुपारी चार वाजता मैत्रयी ग्रुप यांचे श्रीसुक्त व स्तोत्र पठण, सायंकाळी पाच वाजता हळदी-कुंकू, रात्री साडेनऊ वाजता हभप श्री चारुदत्त आफळे (पुणे) यांचे ’वंद्य वंदे मातरम्’ या विषयावर सुश्राव्य कीर्तन होणार आहे.

सोमवारी (ता. 26) सकाळी साडेआठ वाजता श्रींना लघुरुद्र व ब्रह्मवृंदातर्फे श्रीसुक्त अभिषेक, सकाळी 10 ते 2.30 वाजेपर्यंत कृष्णाबाई संस्थानतर्फे महाप्रसाद, रात्री 10 वाजता स्वरवैभव क्रिएशन (सांगली) प्रस्तुत, मराठी भक्तिगीते व भावगीते यांचा बहारदार कार्यक्रम परेश पेठे व कलाकार (सांगली) सादर करणार आहेत.

मंगळवारी (ता. 27) सकाळी साडेआठ वाजता ’श्रीं’नालघुरुद्र व ब्रह्मवृंदातर्फे श्रीसुक्त अभिषेक, दुपारी दोन वाजता श्रीकृपा भजनी मंडळ यांचे भजन, दुपारी चार वाजता श्रीसुक्त पठण गंगापुरी, सायंकाळी पाच वाजता मुरलीधर भजनी मंडळ यांचे भजन, साडेसहा वाजता मान्यवरांचे सत्कार व बक्षीस समारंभ, त्यानंतर रात्री दहा वाजता हभप हर्षद जोगळेकर, पुणे यांचे लळिताचे कीर्तन आणि दीपोत्सव होऊन उत्सवाची सांगता होणार आहे. याशिवाय दररोज रात्री सात वाजता आरती व मंत्रपुष्प होणार असून, या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थानचे सरपंच चिंतामणी ऊर्फ रवींद्र महादेव मेहेंदळे यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!